ना झोपतो, ना जागतो, मी वागतो वेड्यापरी;
तंद्रीत एका वेगळ्या मी राहतो वेड्यापरी.
सत्यात अन् स्वप्नातही झाल्या किती भेटी तुझ्या;
रात्रंदिनी बोटावरी मी मोजतो वेड्यापरी.
वेणीत जी तू खोवली होती गुलाबाची फुले;
एकेक त्यांच्या पाकळ्या सांभाळतो वेड्यापरी.
नाते मला लागे पुसू, ‘‘आहेस माझी कोण तू’’?
प्रश्नास ह्या साध्यासुध्या मी हासतो वेड्यापरी.
होणार ते होवो उद्या त्याची न मजला काळजी;
प्रेमात माझ्या आजच्या मी झिंगतो वेड्यापरी.
चोरून सर्वांपासुनी जो ठेवला फोटो तुझा;
त्यालाच एकांती कधी मी चुंबितो वेड्यापरी.
- डॉ.श्रीकृष्ण राऊत
९४२२१७६२६३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा