८ ऑक्टोबर, २००८

ही नवी दु:खे : चंद्रशेखर सानेकर



ही नवी दु:खे जगाला सांगती दिनरात आता;
पाहिजे धन्वंतरी देवाहुनी निष्णात आता.

मी कसे विसरून गेलो मागचे संदर्भ काही?
बोल माझ्याशी जरा तू याच संदर्भात आता.

मारते आहे मला अवकाश त्या बाजूस हाका;
मी मला सोडून द्यावे कोणत्या विवरात आता?

कोणत्या वस्तीत होती साद मी तुजला दिलेली?
ऐकतो आहे तुझा प्रतिसाद मी विजनात आता.

आपला शत्रू खरे तर आपल्या पोटात आहे;
आपले आहेत जे जे तेच करती घात आता.

1 टिप्पणी:

Sameer म्हणाले...

मारते आहे मला अवकाश त्या बाजूस हाका;
मी मला सोडून द्यावे कोणत्या विवरात आता?

kyaa baat hai