वादळाला अडविणेही शक्य आहे;
अन् विजांना झेलणेही शक्य आहे.
तू तिथे आहेस, तोवर प्यास माझी-
मृगजळाने भागणेही शक्य आहे.
तू नको विश्वास ठेवू आरशावर;
तो चहाडी लावणेही शक्य आहे.
जीवघेणी रात्र आहे पौर्णिमेची;
चांदण्याने पोळणेही शक्य आहे.
तोकड्या हातांत आहे जिद्द मोठी;
चंद्र हाती लागणेही शक्य आहे.
संपली नाती अशी की काय सांगू-
सावली मज टाळणेही शक्य आहे.
मो. ९३२३७९५९९६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा