हिंडलो वेड्यापरी या वैनगंगेच्या तिरी;
जीव झाला बासरी या वैनगंगेच्या तिरी.
झोपड्यांचे गाव माझे, माणसे साधीसुधी;
हीच माझी पंढरी या वैनगंगेच्या तिरी.
राबती मातीत काळ्या पांडुरंगाची रूपे;
द्यावयाला भाकरी या वैनगंगेच्या तिरी.
या निळ्या पाण्यात रात्री चंद्र-तारे डुंबती;
स्वर्ग येई भूवरी या वैनगंगेच्या तिरी.
ओततो गगनातुनी कोणीतरी मातीवरी-
अमृताच्या घागरी या वैनगंगेच्या तिरी.
हीच गंगा, वंद्रभागा,नर्मदा,इंद्रायणी;
मोक्ष ये दारावरी या वैनगंगेच्या तिरी.
आमराईतून कोणी जन्मजन्मांचा सखा-
शीळ घाली अंतरी या वैनगंगेच्या तिरी.
मी कधी होऊन राधा हाक त्याला मारतो;
भेट देई श्रीहरी या वैनगंगेच्या तिरी.
वाटतो देवास हेवा,तो म्हणे घेईन रे-
जन्म मी केंव्हातरी या वैनगंगेच्या तिरी!’
हॅलो : (०७१८६) २४५३८६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा