८ ऑक्टोबर, २००८

का कधी संपेल आता : वंदना पाटील



का कधी संपेल आता सांग कारावास माझा;
का मला छळतो कळेना जीवघेणा भास माझा.

आज का वेडी फुले ही गुणगुणाया लागलेली;
तू इथे आली खरे की बोलतो आभास माझा.

हाय एकांती मला तू भेटणे टाळू नकोना;
आवडू लागेल वेडे बघ तुला सहवास माझा.

आठवे ना मज कधी इथल्या फुलांशी बोललो मी;
गंध का येईल आता येथल्या काट्यास माझा.

तारका तेजीमयी तू या नभातिल दामिनी तू;
तू नको पत्ता विचारू किर्र काळोखास माझा.

का मला जागा नसावी मैफलीमध्ये तयांच्या;
हा कुठे माझा गुन्हा की बाज आहे खास माझा.

ना कुणाचा हात पाठी ना घराणे गाजलेले;
माझियापासून झाला हा सुरू इतिहास माझा.

मानतो आभार त्यांचे घेउनी गेले स्मशानी;
वाचला तेव्हा गडे हो चालण्याचा त्रास माझा.

मो. ९४२२४४९८५९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: