ही शूर काचपात्रे गाती जरी पवाडा
घेऊ नये बुडांचा कोणी कधीच झाडा
घाई करून घ्यावी त्यांची प्रमाणपत्रे
मागून न्याय होतो आधी मिळे निवाडा
प्रत्येक फ्लॅटमध्ये आता रवी उदेला..
ते सोसतीच कैसे हिमशीत हा उकाडा?
त्रेतायुगातुनी हे शिस्तीत संत आले
व्हा दूर घामटांनो, घालू का गराडा
त्यांना सलाम ज्यांनी सुकुमार बंड केले
आता अम्हास फाशी केला अम्हीच खाडा
ते जन्मताच त्यांच्या हाती गुलाब होते..
आम्हा भिकारड्यांना हे पोट हा रगाडा
त्यांच्या सुखावलेल्या दु:खास चीड आली
झाला जरा उशीरा, पण शोभिवंत राडा
भयमुक्त गोजि-यांनी स्वातंत्र्य धन्य केले
ही भाकरीच साली अमुचा करी चुराडा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा