गौरवकुमार आठवले
९४२३४७५३३६
१.आई
दारिद्रयाच्या संसाराचे नंदनवनही करते आई;
चिलापिल्यांना प्रकाश देण्या दिव्यासारखी जळते आई.
ममतेचा तो अथांग सागर अन मायेचा उंच हिमालय;
जीव चिमुकला जपावयाला करूणेने हंबरते आई.
थंडी पाऊस उन्हात झिजते,असुन उपाशी सदैव हसते;
संकट समयी बापालाही धैर्याने सावरते आई
घामाच्या अत्तरात भिजुनी मातीलाही सुगंध देते;
शेण-सडयाची मेंदी माखुन तनीमनी मोहरते आई.
चिंध्या जोडुन अंग झाकते अन घरटयाची लाज राखते;
वात्सल्याची तरी घरावर शाल खरी पांघरते आई.
अंगाईतुन जिच्या झिरपतो परक्यांच्याही मुलांस पान्हा;
सावित्रीसम चहू दिशांनी तीच खरी दरवळते आई.
बाळ भुकेने तडफडताना भीक मागण्या वणवण फिरते;
वखवखलेल्या नजरा चुकवित संस्कृतीसही जपते आई.
हरेक आई असते बाई; हरेक बाई नसते आई;
अर्भक फेकुन देणारीही क्षणाक्षणाला मरते आई.
आयुष्याच्या संध्याकाळी चाचपडू लागते बिचारी;
पंखामध्ये बळ आल्यावर मुलास अडचण ठरते आई.
२.आम्ही
पुन्हा बाबा तुझा सौदा कराया लागलो आम्ही;
स्वत:ची अस्मिता आता विकाया लागलो आम्ही.
जिथे जाण्यास आम्हाला जरी केली मनाई तू;
फिरूनी त्याच वाटेवर पळाया लागलो आम्ही.
जरी लाथाडले त्यांनी तरी लाचारिने सारे;
पुन्हा कॉंग्रेस गवतावर चराया लागलो आम्ही.
उशीराने जरा सुचले नव्याने एक होण्याचे;
निवडणूकीमधे जेव्हा हराया लागलो आम्ही.
तुझा नावावरी येथे दुकाने मांडुनी सारी;
खिसे आपापले बाबा भराया लागलो आम्ही.
हवी आहे निवा-याला जरा खुर्चीतली जागा;
म्हणूनी पाय परक्यांचे धराया लागलो आम्ही.
समाजाला तसा अमुचा भरोसा राहिला नाही;
समाजाचे खरे शत्रू ठराया लागलो आम्ही.
३.शायरी
संकटाशी झुंजताना जिंकलो नाही जरी;
जिंदगी माझी पुन्हा मी लावली डावावरी.
मी तुझे लाथाडतो लाचारिचे मिष्टान्नही;
स्वाभिमानानेच खातो मी शिळयाही भाकरी.
हाच ठरला शेवटी दुनियेपुढे माझा गुन्हा;
वागलो ना मी कधी सोडून माझी पायरी.
भेटण्यासाठी तुला कोठून काढू वेळ मी?
भेटतो हल्ली मला मी चोरूनी केव्हातरी!
औषधांच्या वेदना मज सोसता आल्या कुठे ?
मीठ चोळूनीच माझी जखम ही झाली बरी.
कोणता गजरा फुलांचा माळला होतास तू ?
वादळे उठती सुगंधी रोज माझ्या अंतरी.
काय मजला द्यायचा सन्मान तो आताच द्या;
व्यर्थ का मेल्यावरी करता जयंती साजरी ?
झोपडीजवळीच माझ्या बांधिले संकूल तू;
अन गरीबीचीच माझ्या छान केली मस्करी.
आत्महत्येच्या विचाराने कुणी जर ग्रासला;
सांगतो वाचेल तो वाचून माझी शायरी.
४. आता जगावयाची
आता जगावयाची आली मला शिसारी;
मजलाच मारण्याची मी घेतली सुपारी.
हा कोणत्या ऋतूंचा आलाप छेडला मी;
भेटावयास आला मज चंद्रही दुपारी.
कोणीच का कुणाचे ऐकून घेत नाही ?
सारेच दावती ते आपापली हुशारी.
दिसतात लोक तेथे तळहात बांधलेले;
टोळी जिथे पकडली पंचांग सांगणारी.
जे गाव शासनाचे आदर्श गाव ठरले;
बहुधा तिथे लफंगा होता कुणी पुजारी.
खादीत बांधलेल्या आश्वासनास सांगा;
चुकवा म्हणा अगोदर तुमची जुनी उधारी.
मी गोठवून आलो संवेदनाच माझ्या;
मज घाव होत नाही कुठला अता जिव्हारी.
का व्यर्थ दोष देतो दुनियेस ‘गौरवा’ तू ?
तुजला तुझीच वेड्या नडली इमानदारी.
५. आपण
बोललेले शब्द कोठे पाळतो आपण ?
कारणे सांगायचेही टाळतो आपण.
ही खरी आहे तुझी माझी परीक्षा बघ;
एकमेकांना कसे सांभाळतो आपण.
ये भविष्यावर कधी तर मोकळे बोलू;
भूतकाळाला कितीदा चाळतो आपण.
माणसांना चल जरा समजून घेऊया;
व्यर्थ दगडांनाच का ओवाळतो आपण.
राहवेना भेटल्यावाचून दोघांना;
रोज भेटूनी जरी कंटाळतो आपण.
ये फुलांनाही जरा शोधून काढूया;
सारखे काटेच का न्याहाळतो आपण.
होत नाही चांगला संवादही साधा;
कां असे हृदयास अपुल्या जाळतो आपण.
ह्या जगाला थांगपत्ताही नसे याचा;
रोज एकांतात अश्रू ढाळतो आपण!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा