२७ सप्टेंबर, २००९

दोन गझला : डी.एन.गांगण



डी.एन गांगण
९३२३७९५९९६

१.आपण

किती खरे अन् किती झूट वावरतो आपण;
विनामुखवटे बहुरुपियाही बनतो आपण.

खरा चेहरा घेउनी कोणी हिंडत नाही;
स्वत: स्वत:चा बनुन तोतया फिरतो आपण.

दु:ख कशाला करावयाचे दुरून आता;
नात्यानेही तसे जवळचे नव्हतो आपण.

स्वप्नांमागुन स्वप्ने तुटती समोर अपुल्या;
तरी शेवटी स्वप्नांसाठी जगतो आपण

नश्वर आहे देह आपुला माहित असुनी,
अन् वरवरच्या रुपास बघुनी भुलतो आपण;

जीवन म्हणजे नाटक असते या जगण्याचे;
अन् “जन्माचे नाटक झाले” म्हणतो आपण.

सिध्द कराया मीही आहे एक असामी;
नको नको ते उपद्व्यापही करतो आपण.

कोण कुणाचा हेच पाहुनी मत देताना
स्वत्वहीन अन् तत्वहीनही बनतो आपण.

२.तार

( तरही गझल - जुल काफिया )

‘ मी त्या भल्या पहाटे लावून दार आले
हातात आसवांचा वाहून भार आले’
- सुलभा कामत

मी त्या भल्या पहाटे लावून दार आले;
हातात आसवांचा वाहून भार आले.

ज्यांच्यावरीच होता विश्वास ठेवला मी;
त्यांच्याच संगिनींचे झेलून वार आले.

जाऊ अता कशी मी, परतून त्या ठिकाणी...
टाळून ‘बाल्य’ माझे चालून फार आले.

सामील गाव झाला माझा यशात जेव्हा;
कोणी न आप्त माझे घेऊन हार आले.

मी दु:खही स्वत:चे नेले स्वत:बरोबर;
कोणावरी न माझा, टाकून भार आले.

‘निर्माल्य’ जीवनाचे, मृत्यूस वाहिले मी
शब्दांत फक्त एका, सांगून सार आले

बदसूर साज होता, जुळवूनही जुळेना
मी एवढयाचसाठी, तोडून तार आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: