२७ सप्टेंबर, २००९

दोन गझला : कमलाकर देसले



कमलाकर देसले
९४२१५०७४३४

१.ऐश्वर्य

पाहिले रे पत्थरातुन डोलणारे फूल मी;
ईश्वरा रे घेतली बघ ही तुझी चाहूल मी.

मंदिरातिल मूर्तिचे दर्शन मला आता नको;
हे निरागस हासणारे पाहतो रे मूल मी.

मागच्यांचा पाय रक्ताळू नये वाटे मला;
वेचतो वाटेतले बघ रोज आता शूल मी.

जाळुनी वस्त्या तरी ते शांत नाही बैसले;
भाकरी भाजून देण्या होतसे रे चूल मी.

ताल देते पिंपळाचे पान, टाळी वाजते;
हे तुझे ऐश्वर्य गाण्या होतसे बुलबूल मी.


२.सोपे

सोसतांना हासणे नाहीच सोपे;
चेह-याला झाकणे नाहीच सोपे.

रे निखा-याला असे गोंदून घेता...
गार वाटे सांगणे नाहीच सोपे.

मृत्युच्या विक्राळ दाढेतून जाता...
‘‘खेळ आहे’’ सांगणे नाहीच सोपे.

हारतांना रोजच्या सा-या लढाया;
जिंकलो हे सांगणे नाहीच सोपे.

होत नाही ‘राम’ मी मग,तोवरी ह्या-
रावणाला मारणे नाहीच सोपे.

माणसाच्या वेषधारी श्वापदातुन-
माणसाला शोधणे नाहीच सोपे.

1 टिप्पणी:

भागवत (बाळू) घेवारे म्हणाले...

देसले सर, गझला वाचल्या.छान आहेत .
घेवारे सर.(९४२१३८२५१७)