१३ नोव्हेंबर, २००९

बातचित : मन्नान बेग मिर्झा



सुधाकर कदम विदर्भातील एक आघाडीचे गझल गायक़. स्वतः संगीताची आराधना करीत असतानाच कदम यांनी आर्णी(जि़. यवतमाळ) येथे गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना केली़. शालेय पाठ्यपुस्तकातील कवितांना स्वरसाज देऊन त्यांच्या ध्वनिफिती त्यांनी तयार केल्या़. तर ‘अशी गावी कविता’या शीर्षकाची एक व्हिडिओ कॅसेट प्रसिध्द केली आहे” त्यांच्या कलाप्रवासाविषयी आणि उपक्रमांविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत़.
प्रश्न - मराठी गझल म्हणून आपण ज्या प्रमाणात मेहनत घेतली त्या प्रमाणात आपणास प्रतिसाद मिळाला नाही असे वाटते याचे नेमके कारण काय?
कदम - मूलतः मराठी गझल गझल म्हणून रुजायला व लोकांना रुचायला बराच काळ लागला़. सुरुवातीच्या काळात श्री सुरेश भटांशिवाय दुसरा गझलकार महाराष्ट्रात नव्हता़. सध्या अनेक गझलकार त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे येत आहेत़. परंतु ज्या प्रमाणात गझल लिहिणारे तयार झाले. त्या प्रमाणात गझल गायन करणारे तयार झाले नाही़.
माझा मूळ स्वभावच गझलच्या प्रकृतीशी जुळणारा असल्यामुळे व मला हा गीतप्रकार आवडल्यामुळे स्वतःला यात झोकून दिले़. गझल ही गझलसारखीच गायिली जावी म्हणून तर ३-४ वर्ष मी मेहंदी हसन, गुलाम अली व जगजितसिंग यांच्या गायकीचा अभ्यास केला. नंतर माझ्या कार्यक्रमाला सुरुवात केली़. अशाप्रकारे स्वतःला झोकून देऊन पूर्णतः तीन तासांचा मराठी गझलचा कार्यक्रम करणारे गायक पुढे न आल्यामुळे व मराठी गझल थोडीफार दाद घेते म्हणून आपल्या इतर गाण्यांसोबत एक-दोन गझल सादर करणारे लोक पुढे आल्यामुळे मराठी गझल गायकी जनमानसात रुजली नाही़. ती रुजावी म्हणून शास्त्रीय संगीताच्या बैठकीचा आधार घेऊन मी अनेक स्वररचना तयार केल्या़. त्याचा फायदाही मला झाला व रसिकांनीही मान्यतेची पावती दिली. परंतु आपले कार्यक्रम सतत घडवून आणण्याकरिता जे काही प्रकार करावे लागतात ते मी करु शकलो नाही़. त्यामुळे आपण म्हणता तसा प्रचंड प्रतिसाद मला मिळाला नसेलही; परंतु आर्णीसारख्या खेड्यात राहून महाराष्ट्रातच नव्हे परप्रांतातही शेकडो कार्यक्रम करून जी लोकप्रियता व प्रतिसाद मला मिळाला तो निश्चितच कमी नाही,असे मला वाटते़.
प्रश्न - आपण आर्णीत गांधर्व संगीत विद्यालय, अभिनय कला मंडळ वगैरे संस्था स्थापन केल्या, यामागे आपला काय उद्देश होता?
कदम - या दोन्ही संस्था स्थापन करण्यामागे आर्णी व परिसरातील बालकांना व तरुणांना या अभिजात संगीताची माहिती होऊन त्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळावी हाच उद्देश होता़.याकरिता मी विनामूल्य संगीताचे वर्ग चालविले़. त्यात हार्मोनियम, सरोद, तबला, मेंडोलीन, व्हायोलिन वगैरे वाद्यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना मी दिले़.
नाट्य क्षेत्रात आभरुचि असणार्‍यांकरिता अभिनय कला मंडळाची स्थापना केल्यानंतर आर्णीतील अभिनयाच्या क्षेत्रातील मंडळींना प्रोत्साहन मिळाले़. एकांकिका बसविण्यापासून त्यांनी आपल्या नाट्य क्षेत्रातील कामगिरीची सुरुवात केली़. त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून एकांकिका स्पर्धाचे मी आयोजन केले़. याचे फळ म्हणजे आज विदर्भात श्री मरगडे यांची ‘झोळी’ ही एकांकिका प्रत्येक स्पर्धेत पारितोषिक मिळवित आहे़. यामुळे मी ज्या संस्था स्थापन केल्या त्यांचा उद्देश सफल झाला असे मला वाटते़.
प्रश्न - महाराष्ट्रभर मराठी गझलचे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम करूनही आपण जे कार्य केले त्याबद्दल प्रसिध्दी माध्यमांनी आपणास न्याय दिला का?
कदम - अर्थातच नाही़. काही विशिष्ट लोकांची मिरासदारी असलेले दुरदर्शन आपल्या वर्तुळाबाहेरच्या कलाकारांना निमंत्रित करणे कमीपणाचे समजत असावे़. तसेही विदर्भात गायक, वादक, कलाकार नाहीच असा मुंबई दुरदर्शनचा ठाम समज आहे़. माझा चार वर्षापूर्वी एक कार्यक्रम मुंबई दुरदर्शनने घेतला होता़; तोच सतत तीन वेळा दाखवून माझा बहुमान केला़. परंतु ‘शब्दांच्या पलिकडले’ या कार्यक्रमाकरिता मी केलेल्या पत्रव्यवहाराला साधे उत्तर देणेही त्यांना जमले नाही़.
प्रश्न - रसिकांच्या बाबतीत आपले अनुभव काय ?
कदम - भारतीय शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या व नवीनच प्रचारात आणलेल्या मराठी गझल गायकीला चोखंदळ रसिकांनी मला प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, हे ठिकठिकाणच्या पत्रावरुन व कार्यक्रमाच्या बातम्यांवरुन आपल्या लक्षात आलेच आहे़.त्यामुळे यावर भाष्य करु नये असे मला वाटते़.
प्रश्न - हिंदी गझलला मिळालेल्या अपार लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर मराठी गझल गायकीचे स्थान काय आहे?
कदम - हिंदीच्या तुलनेत मराठी भाषेला असलेल्या भौगोलिक मर्यादा व संगीत क्षेत्रात काही नवीन करु इच्छिणार्‍यांसाठी असलेली शासनाची व दूरदर्शनची नकारात्मक भूमिका यामुळे मराठी गझल गायकीचे स्थान तसे नगण्यच आहे. हा नवीन प्रकार लोकप्रिय करायचा असला तर शासनाने देशभर जिथे जिथे महाराष्ट्र मंडळे व सांस्कृतिक मंडळाच्या शाखा आहेत तेथे तेथे मराठी गझल गायनाचे कार्यक्रम घडवून आणल्यास या गायन शैलीचा प्रसार व प्रचार होवून तिला रसिकाश्रय मिळेल़. कारण हिंदी गझलसुध्दा फारशी, उर्दू असा प्रवास करीतच लोकप्रिय झाली़. उत्कृष्ट गायक व प्रचार माध्यमाद्वारे ती लोकांपर्यंत पोहचली़. अर्थात मधल्या काळात निकृष्ट सिनेसंगीतामुळे रसिकांना हा प्रकार एकदम आवडायला लागला हेही तेवढेच खरे आहे़. तसेच मराठीत सुद्धा घडणे कठीण नाही फक्त मराठी गझल गायकांची संख्या वाढून मराठी गझल गझल सारखी गायिल्या जायला हवी़.
प्रश्न - कवितांना स्वरबद्ध करणे, त्यांच्या ध्वनिफिती तयार करणे, जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर कविता गायनाची, एक सूर एक ताल व गीतमंचाची शिबिरे आयोजित करुन त्यात मार्गदर्शन करणे, ‘अशी गावी कविता’ या कवितांवर आधारित व्हीडिओ कॅसेटची निर्मिती करणे वगैरे अनेक उपक्रम राबविले या करिता आपणास शासन, व शिक्षण विभागाकडून भरघोस मदत व प्रतिसाद मिळाला का?
कदम - याचेही उत्तर खेदाने ‘नाही’ असेच मला द्यावे लागत आहे़. इयत्ता १ ते १० च्या मराठी पाठ्यपुस्तकातील कवितांना स्वरबद्ध करून मी जे काही उपक्रम राबविले ते एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कोणीच राबविले नसताना व माझ्या सर्व उपक्रमांची माहिती शिक्षण विभागापासून शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहचली असतांनाही सगळ्यांनी याकडे दुर्लक्ष केले़. यामुळे प्रतिसाद मिळण्याचा प्रश्नच येत नाही़ फक्त वा़ शं पाटील हे शिक्षणाधिकारी यवतमाळला असताना त्यांनी मात्र माझ्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले व भरपूर प्रतिसाद दिला़. त्यांच्या सहकार्यानेच व प्रेरणेनेच मी याही कार्यात स्वतःला झोकून दिले होते़.
प्रश्न - इतर संस्थांचा प्रतिसाद कसा राहिला ?
कदम - १९८३ मध्ये माझ्या संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल महाराष्ट्र जेसीजने व यवतमाळ कॉटन सिटी जेसीजने महाराष्ट्रातील सर्वोकृष्ट युवक म्हणून मला पुरस्कृत केले़.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: