१३ नोव्हेंबर, २००९

एक कलंदर कलावंत़ : मनोज पाटील माहुरे

















खरं म्हणजे या माणसाबद्दल दोन-चार शब्द लिहिणे तेही माझ्यसारख्याने, तसे ऐपतीबाहेरचे काम आहे़. तरी पण या माणसाबद्दल माझ्या मनात जो आदर, जिव्हाळा आपुलकी आहे; ती मला माझ्या ऐपतीबाहेरचे काम केल्याशिवाय स्वस्थ बसू देणार नाही. याची जाणीव होती म्हणून गांधर्व संगीत विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्य हा प्रयत्न !
माणुस जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल काही लिहितो तेव्हा लिहिणार्‍याचे त्या व्यक्तीसोबत निश्चितच काही तरी स्नेह संबंध असतात़, नाते असते़. यापैकी काहीच जर नसेल तर किमान शत्रुत्व तरी असते़ आणि यापैकीच कोण्यातरी कारणामुळे आपण आपल्या भावना शब्दरुपात व्यक्त करतो, लिहितो़.
सुधाकर कदम यांच्याशी माझं नातं काय? संबंध काय? खूपदा शोधूनही या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं नाही़. कारण शालेय जीवनात त्यांचा विद्यार्थी म्हणून आणि सध्या असलेली आदरयुक्त मैत्री, यापैकी नेमका कुठल्या भावनेने त्यांच्याशी बांधला जाऊन कोणत्या भावनेने मी लिहित आहे, याचा उलगडा होणं कठिणच ! तरी पण या व्यक्तीशी कुठंतरी माझ्या मनाच्या तारा जुळल्या आहेत एवढे मात्र निश्चित़.
मी जेव्हा पाचव्या इयत्तेमध्ये आर्णीला शिकायला आलो. त्याच वर्षी सुधाकर कदम हे संगीत शिक्षक म्हणून आमच्या शाळेत रुजू झाले़. स्वभावाने थोडे रागीट वाटणार्‍या (असणार्‍या) कदम सरांनी आमचे विद्यार्थीजीवन सप्तसुरात न्हाऊन काढले़. अगोदर बेसुरी वाटणारी शाळा आणि आम्ही विद्यार्थी अगदी सुरात आलो़ संगीत शिक्षक म्हणून त्यांच्या कार्याची ही पावतीच नव्हे का?
पुढे जसजसा काळ पुढे सरकत गेला. सुधाकर कदमांच्या व्यक्तिमत्वाचा एक एक पैलू उजळत गेला, अनुभवास येवू लागला. संगीताच्या क्षेत्रात तर त्यांनी आर्णी सारखं खेडेवजा गांव प्रसिद्ध केलंच पण त्याचबरोबर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी करून आम्हा तरुणांना एक दिशा दिली़. अनेक संस्था स्थापन केल्या़ अनेक उपक्रम राबविले आणि आजही राबवीत आहेत़. आम्हा आर्णीकरांना संगीत, नाट्य, साहित्य या अभिजात कलांच्या रसास्वादाची जाण करून दिली़.नाटक, संगीत, व्याख्यान, कविसम्मेलन कशी पहावी, कशी ऐकावी याचे भान करून दिले़. एवढेच नव्हे तर आर्णीसारख्या छोट्याशा गावातील कलाकारांचे चेहरे त्यांच्या अविश्रांत परिश्रमामुळे मुंबई दुरदर्शनवर झळकलेले आर्णीकरांना पाहता आले़.
मी ज्या खेड्यात राहतो त्या काठोडा गावी प्रसिध्द गझलकार कविश्रेष्ठ सुरेश भट, प्रसिध्द तबला वादक विठ्ठलराव क्षीरसागर (पुणे) बासरी वादक स्व़. दत्ता चौगुले (वसमत), पुणे आकाशवाणीचे सारंगीवादक पैगंबरवासी लतीफ अहमद खान, कवी लक्ष्मीकांत तांबोळी (देगलूर) पं. जितेंद्र आभषेकीचे पट्टशिष्य श्री राजा काळे यांच्यासारखे थोर कलावंत, साहित्यिक केवळ सुधाकर कदमांमुळे आमच्याकडे येऊन गेले़. माहुरे कुटुंबाला संगीत आणि सूर यांचा अगदी जवळून परिचय करुन दिला़. काठोड्यात जमलेल्या त्यांच्या मैफिलींना व त्यामुळे घडलेल्या सहवासामुळे आमचे गळे जरी तयार झाले नाही तरी कान मात्र उत्तम प्रकारे तयार होऊन कानसेन या संज्ञेस पात्र झालो एवढे मात्र निश्चित़.
मराठी गझलला योग्य प्रकारच्या बंदिशी बांधून मराठी गझल, गझलसारखी सादर करुन सन्मानाने श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याचे फार मोठे कार्य त्यांनी सर्वप्रथम केले़. मराठी गझल गायनाच्या क्षेत्रात खरोखरच सर्वश्रेष्ठ असणारा हा कलावंत आजच्या जाहिरात व शोमॅनशीपच्या युगात मागे पडला ही खरी शोकांतिका आहे़. मराठी गझलला त्यांनी दिलेल्या बंदिशी म्हणजे सरस्वतीने त्यांना मुक्तहस्ताने दिलेलं दान आहे़.सुरेश भट सुध्दा आमच्यासमोर हे मान्य करायचे.
जवळच्या सुरांची मुक्त उधळण समर्थपणे व मुक्तपणे करून सुद्धा आमच्या समाजाच्या दळभद्रीपणा असा की ते श्रीमंत स्वर आम्ही वेचून पदरात सामावून घेवू शकलो नाही़.कारण आमचा पदरच तोकडा पडला़. त्यांच्या संगीत साधनेला, उपासनेला, मेहनतीला आपण कधीच न्याय देऊ शकलो नाही़. असे खेदाने म्हणावेसे वाटते़. हीच खरी खंत आहे़. पण आपल्याच मस्तीत जगणार्‍या सुधाकर कदमांनी कोण न्याय देत नाही याची कधीच फिकिर केली नाही़. प्रखर स्वाभिमानी स्वभावामुळे पैसा, नावलौकिक, प्रसिद्धी यासाठी लाळघोटेपणा, चाटूगिरी, चरण छू ईत्यादी किळसवाणे प्रकार कधीच केले नाही़. पण आजच्या जगाचे मुख्य क्वालिफिकेशन तेच असल्यामुळे हा कलावंत मागे राहिला़ त्यामुळेच हा असाधारण व्यक्तिमत्वाचा धनी मात्र कधी कधी एकाकी वाटतो़. संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या २५-२६ वर्षापासून पोटतिडकीने कार्यरत असलेले सुधाकर कदम आजही एकाकी वाटतात याचं कारण आपली व आपल्या बहुजन समाजाची साहित्य व संस्कृतीबद्दलची असलेली अनासक्ती हेच आहे़.
पण या ध्येयवेड्या माणसाने ह्या गोष्टीची कधीच दखल घेतली नाही. घेतलेला वसा सोडला नाही़. जिसका जितना आचल होता है । उतनीही सौगात उसे मिलती है। हे सांगत सप्तस्वरांच्या सानिध्यात राहणारा, स्वरांच्याच अवगुंठनात जगणारा कलंदर आजही एकटाच झुंजत आहे़ पुढेही झुंजत राहणार याची खात्री आहे़. सध्या आर्णीत सांस्कृतिक व सांगितिक उपक्रमांना जो प्रतिसाद मिळत आहे तो पाहून उशीरा का होईना त्यांची मेहनत फळाला येत आहे़. त्यांची जिद्द व धडपड एकरूप घेऊन आकाराला येत आहे़ हे ही नसे थोडके !
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, खूप काही सोसूनही त्यांनी स्वतःतला कलावंत जिवंत ठेवून संगीतावरील अपार श्रद्धा जपली़. इश्वर या लढवय्या कलावंतास दिर्घायु-आरोग्य देवो़. बस !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: