१३ नोव्हेंबर, २००९

कुटुंब रंगलंय गझल गायनात : विलास वातीले

तबल्यावर निषाद कदम, गातांना भैरवी कदम,रेणू च्व्हाण, साथीला सुधाकर कदम

कविश्रेष्ठ (कै़) सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचा स्वर म्हणजे मैफिलीची बहारदार रंगत़. महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन म्हणून (कै़) भट त्यांचा गौरव करायचे़. मराठी गझल रुजविण्याचे, फुलविण्याचे व लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत पोचविणार्‍या अनेक गझल गायकांच्या नामावलीत सुधाकर कदम यांचे नाव घ्यावेच लागेल़. गझल गायनातील वर्षानुवर्षाच्या प्रवासात त्यांच्या कुटुंबीयांनासुध्दा गझलचे जणूकाही वेडच लागले आहे़. त्यांच्या दोन्ही मुली व मुलानेसुध्दा गझल गायनाचा वसा घेतला आहे़.
आर्णी शहरातील श्री महंत दत्तराम भारती विद्यालयात सुधाकर कदम संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते़. अलीकडेच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरातील संगीत क्षेत्रात जम बसविला आहे़. पत्रकारिता, लेखक, गीतकार, संगीतकार व गायक हा त्यांचा जीवनालेख अनेकांना मोहित करणारा ठरला़. ‘फडे मधुर खावया़’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे; परंतु ते गझल गायक म्हणूनच सर्वत्र परिचित आहेत़.
संगीत हे परमेश्वराने मानवाला दिलेली देणगी, तिची मनापासून आराधना केल्यास सार्वत्रिक सुखाचा आनंद उपभोगता येतो़. शब्दांना स्वरसाज चढविण्याचे कसब हाती आले की, रसिकांना मोहित करणे सहज साध्य होते़. मराठी, हिंदी गीतांना स्वरबद्ध करता-करता ते गझल गायनाकडे खेचले गेले़. दरम्यान, (कै़) सुरेश भटांशी स्वर जुळले़. हृदयाला स्पर्श करणारे त्यांचे शब्द व कदम सरांचे स्वर ‘अशी गावी मराठी गझल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोचली़. या दोघांनी मिळून मराठी गझल गायनाला चांगले दिवस आणले़.
मराठी गझलबाबत कदम सर म्हणतात, ‘गझल गायकाला गझल कळली, तरच गाताना ती परिणामकारक होते़ रसिकांच्या हृदयापर्यंत ती पोचली पाहिजे़ त्यातील शेर सादर करण्यावरही गझल शब्दाला अनुरुप स्वरसाज, गायनाची रंगत वाढविते़. रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी स्वरांचे अवगुंजन करावे लागते.
सरांसोबत त्यांचे कुटुंबही गझलकडे वळले़. मोठी कन्या कु़. भैरवी व छोटी कु़. रेणु गझल गायनात रंगून गेल्या़. सांस्कृतिक नगरी, पुणे येथे त्यांचा संगीत क्षेत्रातील संचार कदम सरांच्या तपश्चर्येचे फलित समजण्यास हरकत नाही़. कु़ भैरवीची ‘सरगम तुक्याचासठी़’ आणि कु़. रेणूची हिंदी-उर्दू गीत गझलांची अनोखी मैफल़ ‘तो गजल होती’ ह्या कलावैदर्भी प्रस्तुत गायनाने अख्खा महाराष्ट्र पालथा घालण्याचा चंग बांधला आहे़. सुमधुर स्वरांच्या या भगिनींच्या स्वराला संगीताची साथ त्यांचे बंधू निषाद कदम देत असतात़. वडिलांचा वारसा वृध्दिंगत करण्यासाठी अहोरात्र सरस्वतीची आराधना करण्यात ते तल्लीन झालेले आहेत़.
अलीकडेच पुणे येथील सुप्रसिध्द उर्दू शायर महरुम हनीफ सागर यांच्या ‘नग्म-ए-सागर’ या नावाने मैफिली रंगत आहे़त. कु़. भैरवी, कु़. रेणु या गायिका, तालसंगत निषाद, तर सूत्रसंचालन सागर साहेबांचे शागीर्द इकबाल हमीद करीत असतात़. सागर साहेबांच्या गझला, कदम सरांच्या बंदिशी, दोन्ही कन्यांचा स्वर, निषादचा तबला व इकबाल हमीद यांचे निवेदन म्हणजे शायरी व संगीत रसिकांना अलौकिक मेजवानीच ठरत आहे़.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: