१३ नोव्हेंबर, २००९

मैत्री़ची मालमत्ता : शंकर बढे


















नाते हे प्रश्न पत्रिकेतील पहिला प्रश्न जसा आमच्या वेळी अनिवार्य असायचा तसे असतात़. जरा विस्ताराने सांगायचे झाल्यास नाते निवडता येत नाही म्हणजे तुम्हाला चॉईस नसतो, ते असतातच़. या संदर्भातील माझ्या कवितेच्या दोन ओळी देतो़ म्हणजे माझे म्हणणे अधिक स्पष्ट होईल़.
‘नाई तुह्या रे हातचं सारं वरचा लावते़
ज्याच्या पोटी जल्मसीन त्याचा भाऊ काका होते!’

मैत्रीचं तसं नसते, आपले ज्यांच्या ज्यांच्याशी सूर जुळतात ते ते आपले मित्र होत जातात़. आपला एखाद्याशी परिचय होतो आणि आपण इतके जवळ येतो की इतकी निकटता कधी आली हे आपल्याही लक्षात येत नाही़. या उलट काही काही परिचय हे मैत्रीत बदलतच नाहीत ते परिचयाच्या मर्यादे पावेतोच कायम राहतात़.
मैत्री होते़ ती ही एका विशिष्ट वयापावेतो. नंतर लहानपणासारखी किंवा तरुणपणासारखी मैत्री नाही जुळत़. त्या वयातील मैत्रीत आणखी एक मौज असते ती निखळ मैत्री असते़. कुठला ही स्वार्थ त्यामधे नसतो. आणि त्यावेळी मित्र म्हणून स्वीकारलेला आपला मित्र जेव्हा लौकिक अर्थाने मोठा होत जातो तेव्हा मनापासून आनंद होतो़.
सुधाकर आता महाराष्ट्राला कलावंत म्हणून परिचित झाला आहे़. परंतु या प्रवासातील त्याची सुरुवात मी पाहिली आहे़. त्या वेळची त्याची जिद्द, धडपड आणि एकाकी लढत. तो लढला म्हणूनच तो कलावंत म्हणून उभा राहू शकला़. तुम्हाला चांगले मित्र मिळणं हा सुध्दा नशिबाचा भाग असतो.कारण तशा मित्रापासून आपल्यालाही शिकायला मिळतं. सुधाकरमुळे त्या बाबतीत माझा बराच फायदा झाला हे ही तितकेच खरे़.
सुधाकरची माझी पहिली भेट झाली ती भाग्योदय कला मंडळाच्या ऑफीसमध्ये़. त्या मंडळाचा जो ‘शिवरंजन’ आर्केस्ट्रा होता; त्यात तो हार्मोनियम वाजवायचा़. आमच्या कॉलेजमध्ये तेव्हा महेश शिरे होता. त्याच्या आग्रहामुळे त्या ग्रुप मध्ये गेलो़ तिथे मग सर्वांशी परिचय झाला़. त्या मंडळाचे अध्यक्ष होते श्री गजापुरे. तर कलावंत मुकेवार, शिरे, आव जोशी, दिपक देशपांडे, डफळे, योगेश मारु नानवटकर ही मंडळी होती़.
दुसर्‍या वर्षी माझं शिक्षण बंद झाल्यामुळे मी बोरी वरुन जाणंयेणं करु लागलो.या काळात मी आणि सुधाकर अधिक जवळ आलो़. रात्री २/३ वाजता कार्यक्रमावरून परत आल्यावर माझा मित्र प्रवीण छेडा याच्या खोलीवर झोपून मी सकाळी बोरीला जायचो. तेव्हा सुधाकर घरी न जाता माझ्या सोबतीला थांबून सकाळी त्याच्या सायकलने स्टॅंडवर पोहचवून द्यायचा़. अशा धावपळीच्या जगण्यात आम्ही आणखी जवळ जवळ येत गेलो़.
आर्केस्ट्राने प्रसिद्धी तर दिलीच परंतु आम्हाला अनुभवातून शिकायला खूप मिळाले़. सात, आठ वर्षांचा तो काळ कसा निघून गेला हे कळले सुद्धा नाही. आणि एकदिवस कार्यक्रम थांबले़. सुधाकर नोकरी मुळे आर्णीला गेला़. त्याच्या मनाचं रितेपण त्याला सतावू लागलं. आपण काही तरी करायला पाहिजे असं त्याला वाटत होतं. पण काय करावं हे सुचत नव्हतं. माझ्या डोक्यात एक कल्पना आली़. मी त्याला सुचवलं की तू गाण्यांना चाली फार चांगल्या देतो मग ते चालू ठेव. त्याचा कधी ना कधी उपयोग होईल़.
त्या नंतर माझ्या परिचयातून जेष्ठ कवी सुरेश भटांशी त्याचा परिचय झाला आणि एका नव्या पर्वाला सुरवात झाली़. गझलांच्या त्याने सुरेख चाली बांधल्या आणि त्या लोकप्रिय झाल्या़. आर्केस्ट्रा नंतर पुन्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुधाकर रसिकांपुढे आला़. आर्केस्ट्राचं यशापयश ग्रुपचं असतं. परंतु या कार्यक्रमाचं यशही तुमचं आणि अपयश ही तुमचच असतं. संगीताची तयारी आणि काव्याची जाण याचा सुंदर मिलाप त्याला या क्षेत्रात भरभरुन यश देत गेला.
सुधाकर या नावाला एक वलय प्राप्त झालं. ग्रामीण भागात राहून इतकं सारं करणं काही सोपं नाही़. मनाची तयारी, दृढ निर्धार तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे सुधाकर. सुधाकर संगीताच्या क्षेत्रात तर आहेच परंतु आता त्याने चौफेर फलंदाजी सुरु केली आहे़. तो पत्रकार आहे, तसा चांगला स्तंभ लेखकही आहे. आणि स्फूर्ती आली की कविता ही लिहायला लागला आहे़. त्याचं अष्टपैलू व्यक्तित्व असं बहरत आहे़.
काही झालं तरी सुधाकरचा मूळ पिंड संगीताचा़. तो त्याला वंश परंपरेनं मिळालेला ठेवा आहे़. आनंदाची बाब अशी आहे की हा ठेवा बचत ठेवी सारखा न ठेवता त्याची गुंतवणूक त्याने चक्रव्याजात केली आहे़.
सुधाकरची मैत्री ही माझी वैयक्तिक मालमत्ता आहे परंतु तुम्हाला माहित असलेला कलावंत सुधाकर मला कसा वाटतो हा उघडपणे लिहिण्याचा विषय आहे़. तसं तर आपला माणसा विषयी लिहणं कठीणच कारण आपला जवळचा माणूस नेमक्या शब्दात मांडणं सोप थोडच असतं?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: