१३ नोव्हेंबर, २००९

स्वर पंढरीचे ज्ञानेश्वर आमचे सऱ : सौ़ सीमा आनंदराव काशेट्टीवार







गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णू
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुर्साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः
पुरातन काळापासून ते आजतागायत गुरुचं महात्म्य सर्वांनाच माहित आहे़.जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात गुरुचं बळ असणं फार आवश्यक आहे़. गुरु म्हटलं की आपोआपच आपण नतमस्तक होतो़.
माझे संगीत क्षेत्रातील गुरू म्हणजे महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात आणि मध्यप्रदेश वगैरे इ़ ठिकाणी सुपरिचित असलेले सुप्रसिद्ध मराठी गझल गायक श्री सुधाकर कदम़.
आपल्या विदर्भात अशी कोणतीच व्यक्ती दिसणार नाही की ज्याला या मराठी गझल गायकाचे नाव माहित नाही़. त्यांना जर विचारलं तर सर्वांच्या तोंडून सुधाकर कदम हेच नाव ऐकायला मिळेल़.
सुधाकर कदम ह्यांनी आपल्या संगीत शिक्षणाची सुरवात बालपणापासूनच गुरुकडे काम करत करतच केली़. नंतर त्यांनी स्वबळावरच विशारद वगैरे केले. आणि अवघ्या थोड्या कालावधीतच ऍकॉर्डीअन वादक व संगीत नियोजक म्हणून नांव मिळविले़.
यानंतर ते संगीत शिक्षक म्हणून आर्णी येथील श्री म़. द़. भारती विद्यालयात कार्यरत झाले. आणि संगीत क्षेत्रात अमूल्य असे कार्य करण्यास सुरुवात केली. आपली कला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न केले़. त्यांना भरमसाठ यश मिळाले त्यांच्या मैफली खूप ठिकाणी रंगल्या, भरपूर कार्यक्रम झाले, प्रत्येक ठिकाणी वाहवा मिळाली़.
पण एवढ्या चांगल्या सुरेल गायकाला जशी प्रसिद्धी मिळायला पाहिजे होती तशी प्रसिद्धी त्यांना मिळाली नाही़. तसा त्यांना गॉडफादर पण लाभला नाही़. याच ठिकाणी सरांचं गुरुबळ कमी पडल्याचे जाणवते़. पण हेच व्यक्तिमत्व जर पुण्या-मुंबईसारख्या शहरात असते तर त्यांचे नाव गायकांच्या श्रेणीत उच्च स्तरावर राहिले असते़, सर टॉपमोस्ट राहिले असते. पण विदर्भात आतापर्यंत तरी कोणत्याच कलाकाराची कदर झालेली नाही़ त्यांच्या पदरी पडते ती फक्त वाहवा़.
यांच्या एका गझल मधील ओळीचा प्रत्यय इथे आलेला दिसतो़ ती ओळ म्हणजे़-

‘नशिबात गायकांच्या,
नुसतीच वाहवा रे !’

आजही कधी कधी सुरेश वाडकरांनी गायलेली सुरेश भटांचे पहाटे पहाटे मला जाग आली हे गीत ऐकले की लगेच सरांची आठवण येते. कारण, आमच्या सरांनी ह्या गीताला लावलेली सुंदर चाल व गातांना घेत असलेल्या सुंदर हरकती़.
सरांनी फक्त शाळेपुरताच आपल्या कलेचा उपयोग केला नाही तर सर्वांनाच त्याचा फायदा मिळावा यासाठी अथक परिश्रम केले़.
१९८६ साली शैक्षणिक उठाव कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी शाळेची चमू यवतमाळ येथे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नेली होती़. तो कार्यक्रम आजही माझ्या स्मरणात आहे. तो क्षण चिरकाल टिकणारा आहे़. तसेच १ ते १० वर्गातील मराठी कवितेला अप्रतिम, साध्या, सोप्या आणि सुमधुर चाली देऊन झुला ही ऑडिओ कॅसेट दोन भागात बनविली़. त्यांची ही कॅसेट खूपच गाजली. आणि प्रत्येक शाळेत पण वाजली.शैक्षणिक उठाव कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण राज्यमंत्री प्रा़. जावेद खान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री सुधाकरराव नाईक यांचे हस्ते कॅसेटचे प्रकाशन झाले. आणि त्यामधील गायिका कु़ संगीता पद्मावार व माझा (बालकलाकार) म्हणून सत्कार झाला़.
सरांनी १९८७-८८ मध्ये १ ते १० वर्गातील कवितेची व्हीडिओ कॅसेट बनविल्या, त्या कवितांना सुमधूर चाली देवून तसेच कवितेनुसार नाविन्यपूर्ण नैसर्गिक देखावे शुटींग करुन कवितेची गोडी वाढविली़. ती कॅसेट जर आज प्रत्येक शाळेने बघितली तर नक्कीच ती चाल व ती कविता प्रत्येक मुलाच्या ओठावर रुळू शकते़.
त्यांनी १९८८-८९ मध्ये बालचित्रवाणी पुणे साठी शाळेची चमू दुरदर्शनवर झळकवली. त्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम केले़. गाण्यांचा सराव करून घेतला़. आर्णीसारख्या खेड्यातील आम्ही व आमचा ग्रुप दुरदर्शनवर झळकणे ही फार कौतुकास्पद गोष्ट वाटली़. दुरदर्शनवर दोन गीते दाखविण्यात आली, त्यात एक महाराष्ट्र गीत व दुसरे समर गीत होते़. सरांनी ‘हे शिवसुंदर समरशालीनी’ या गीताला इतकी सुंदर चाल दिली की अजूनही ह्या गीताचे नाव सर्वच जण घेतात व म्हणतात की हे गीत फक्त आर्णीच्याच ग्रुपचे छान वाटले, सुमधुर वाटले़.
तसेच त्यांनी गीतमंच या कार्यक्रमाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीस्तरावर गीत मंचाचे प्रशिक्षण दिले़.सरांच्या अमोल अशा मार्गदर्शनामुळे मी संगीत विशारद पर्यंत शिक्षण घेऊ शकले़.
सरांच्या घरचे वातावरण इतके चांगले असायचे की, मी किंवा ग्रुपमधला कोणीही असो तिथे अगदी फ्रेश होऊन जायचे़. नेहमी हसतखेळत वातावरण असायचे. त्यात माझी गुरुमाता सौ़ सुलभा वहिनींचा पण वाटा फार मोलाचा मानते. त्यांच्या वातावरणाचा, तिथे जो पाहुण्यांचा इतरांचा आदर सत्कार व्हायचा तो विशेषच वाटायचा़. तसेच आजच्या युगात जो सोशल एटीकेटसचा प्रकार आहे तो तिथेच जाणवला व त्याचा फायदा मला आज माझ्या शिक्षिका पेशात कामी पडतो आहे़
सरांनी संगीत क्षेत्रात अजून एक भरीव कार्य केले ते म्हणजे आर्णीसारख्या खेडे विभागात ‘सरगम संस्थेची’ स्थापना केली. त्यामाध्यमातून महाराष्ट्रातल्या त्यातून विदर्भातल्या सर्व गायकांना गाण्याची संधी मिळावी ; तो गायक नावारुपास यावा यासाठी अनेक प्रकारे त्रास सहन करून घेतला़. म्हणतात ना, एका कलाकाराची कदर एक कलाकारच करू शकतो़. त्याप्रमाणे त्यांनी मानसिक, शारीरिक त्रास सहन करून गांधर्व संगीत विद्यालयाच्या वार्षिक उत्सवानिमित्त विदर्भ स्तरावर गायन स्पर्धा, कवी संमेलने आयोजित केलीत.
सरांनी इतकी अमूल्य कामे केली की त्यांचे वर्णन करणे शक्य नाही आणि माझ्या दृष्टीकोनातून त्यांचे गुण गायला माझे शब्द सुद्धा कमी पडतात़ अशा माझ्या थोर मनाच्या महान गुरुंना शतशः प्रमाण,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: