१३ नोव्हेंबर, २००९

आडवाटेवरील कलावंत : दया मिश्रा



सुधाकर कदम हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही़. तरीही त्याला मी आडवाटेवरील कलावंत एवढ्यासाठी म्हणतो की, सुधाकर कदम यवतमाळ जिल्ह्यातील एका कोपर्‍यात असलेल्या डोंगरदर्‍यातील आर्णी या छोट्याशा गावी वास्तव्य करुन आहे़. त्याच्या गझल गायकीचा कार्यक्रम जर घ्यायचा असेल तर तुम्हाला पुसत पुसत आर्णीला जावं लागेल़. तरीही सुधाकर कदम महाराष्ट्रभर चांगला परिचित आहे़. हिरवा चाफा जंगलात कितीही लपून असला तरी त्याचा सुगंध लपून राहत नाही;तसे सुधाकरचे आहे़. त्याच्या गळ्यातील गंधर्वाचे स्वरनाद महाराष्ट्राबाहेरही उमटलेत़. मध्यप्रदेशात ग्वाल्हेर, उज्जयिनी, इंदोर इत्यादी ठिकाणी सुधाकरने मराठी गझल पोहोचवली़ गुजरात प्रांतातही त्याच्या गायकीचे पडसाद निनादलेत़ मराठी गझल परप्रांतात मोठ्या सन्मानाने पोहचविणारा सुधाकर कदम का कुणास ठाऊक पण काहीसा उपेक्षितच राहिलेला आहे़
महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवींच्या मराठी गझलांना आपल्या जरतारी स्वरांनी स्वरबध्द करणारा अनेक सभा-संमेलनातून मधुर स्वर लालित्याने रसिकांना अक्षरशः वेड लावणारा आणि आपल्या शिक्षकी पेशाशी इमान राखून इयत्ता पहिलीपासून तो दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी, मराठी, क्रमिक पुस्तकातील कवितांना स्वरबध्द करुन झुला नावाने तीन कॅसेटस काढणार्‍या सुधाकर कदमची व्हावी तशी कदर झाली नाही, याची मला राहून राहून खंत वाटते़ आकाशवाणी आणि दूरदर्शननेही सुधाकरचा आवाज महाराष्ट्रात दूर दूर पोहचविला. तरीही सुधाकर कदमचा सुरेश वाडकर होऊ शकला नाही, त्याचं एकच कारण की सुधाकर कदम विदर्भातील आर्णी या आडवाटेवरच्या गावी राहतो़. तो मुंबई-पुण्यास असता तर एव्हाना चित्रपटसृष्टीला आणखी एक अभिजात संगीतकार - पार्श्वगायक मिळाला असता़ पण ते अद्यापही घडले नाही़.
रानावनातील आर्णी परिसर त्याने कधीच सांस्कृतिक करुन टाकला आहे. एक संगीत शिक्षक काय करु शकतो हे सुधाकरने शिक्षण खात्याला कधीच पटवून दिले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ओठाओठात सुधाकरने गायिलेल्या कविता गुंजन घालताना आढळून येतात, पण शिक्षण खात्याकडून सुधाकरची फारशी दखल घेतल्या गेली नाही. लांगुल चालन हा जो गुण (?) हवा असतो तो सुधाकरजवळ नाही़. त्याला त्याचाही नाईलाज आहे़.
एका गरीब शेतकर्‍याच्या घरात जन्मास आलेल्या सुधाकरने तशी बरीच मजल मारली आहे़.शासन दरबारी आपला कुणी मानसन्मानच करावा, ही भावना सुधाकरला कधी स्पर्शून गेली नाही़. आपला रियाज बरा आणि आपण बरे, असा त्याचा खाक्या आहे़. परवाला मी अचानक आर्णी येथे गेल्यावर माझ्या लक्षात आले की, अगदी तासन्‌ तास सुधाकर आपल्या संगीत विश्वात बुडालेला असतो़. एखादे नवे गीत त्याला सापडले की तो हरखून जातो आणि जोपर्यंत आपल्या मनासारखा स्वरसाज तो त्या गीताला चढविणार नाही तोपर्यंत हा पठ्‌ठ्या हातचा हार्मोनियम सोडणार नाही़.
औरंगाबादचे नाथ नेरळकर मला माहित आहेत़ माझ्या माहितीप्रमाणे नेरळकर आणि कदम हे संपूर्ण महाराष्ट्रात गझल गायनाचा तब्बल तीन तासाचा कार्यक्रम करुन रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवतात़. मेहदी हसन, गुलाम अली, जगजीतसिंग या विख्यात गझल गायकांच्या रेकॉर्डस व कॅसेटस्‌चा विपुल संग्रह सुधाकरकडे आहे़ त्यांच्या गायकीचा आपणास खूप फायदा झाला हे सुधाकर मोठ्या अभिमानाने सांगतो़. पण आपणास नवनवीन स्वर सापडतात ते निसर्गात असे तो ठासून सांगतो़. पक्ष्यांची किलबिल, कोकिळेचे कुहुकुहु, कडेकपारीतून झुळझुळ वाहणार्‍या झर्‍यांचे नाद, फांद्याआडून येणार्‍या वार्‍याच्या झुळकी यातून मला स्वर सापडतात. असे सांगताना सुधाकर कदम गुणवंत तरीही उपेक्षित़. पण विदर्भाच्या मातीचेच हे दुर्भाग्य आहे. त्याला सुधाकर तरी काय करणार ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: