१३ फेब्रुवारी, २०१०

चार गझला : अशोक थोरात

अशोक थोरात
९९६००४८८७८


१.दोन जिवांनी


दोघांचीही बिकट अवस्था,
हा प्रेमाचा कठीण रस्ता.

भेटीसाठी आतुर आपण;
म्हणून खातो इतक्या खस्ता.

कविता लिहिल्या किती तरीही;
हा शब्दांचा खेळच नुसता.

सुरू कळेना कुठून झाले...
कुणी घेतल्या आणा-शपथा.

भेटशील तू स्वप्नात कशी?
रात्र रात्र मी जागत असता.

कशातही हा जीव रमेना;
तुझी आठवण उठता-बसता.

सात्विक,सोज्वळ तुझी प्रतिमा;
मीच इथे बदनाम फरिश्ता.

दोन जिवांनी झुरत मरावे;
हाच येथला खरा शिरस्ता.


२.मळलो नाही


तुला जरी मी कळलो नाही;
तुझ्यापासुनी ढळलो नाही.

नकार आला तुझा कितीदा,
पण माघारी वळलो नाही.

निमुटपणाने सोसत गेलो;
कधी कुणावर जळलो नाही.

जे जे नाही मला मिळाले,
त्यासाठी हळहळलो नाही.

फक्त एकदा ओठ चुंबिले;
पुन्हा कधी पाघळलो नाही.

चोरुन चोरुन सारे केले;
कुठे कुणा आढळलो नाही.

स्वच्छ ठेवले तुला,जगाला;
आणि स्वत:ही मळलो नाही.


३. तरीही भेटतो


कितीदा झाले अपुले भांडण;
तरी भेटतो अजून आपण.

जेव्हा जेव्हा तुला पाहतो;
विसरून जातो माझे ‘मी’पण.

घरात माझ्या बसून असता,
दुरून दिसते तुझेच अंगण.

सांग तुला मी आवडलोना?
म्हणून कुंकू आणिक कंकण.

वाट पाहिली स्वप्नात किती,
रोज रोज का हवे निमंत्रण.

हे विरहाचे ऊन तापते;
आठवणींचा झरतो श्रावण.

नकोत आता कुठल्या सबबी,
त्वरित मला तू दे आलिंगन.


४. निमित्तास


माहित नव्हते कुठे जायचे;
अखेर झाले तेच व्हायचे.

इथे तिथे मी भणंग फिरलो;
आणि विसरलो घरी जायचे.

कोरड पडली जरी घशाला;
अपुले आपण अश्रु प्यायचे.

असेच होते माझे जगणे-
कधी घ्यायचे, कधी द्यायचे.

निमित्तास तू कारण आणिक
निमित्तास मी गीत गायचे.

__________________________________

पुष्पगंधा कॉलनी, कठोरा रोड,अमरावती-४४४६०४
__________________________________

1 टिप्पणी:

Ganesh Dhamodkar म्हणाले...

विविध गझलकारांच्य इतक्या नवनविन गझला वाचायला मिळतात हे तुमच्यामुळेच शक्य झालंय सर. छोट्या बहरमधल्या ह्या चारही गझला दाद देण्यालायकच आहेत. अशोक थोरात यांचं आणखी काही वाचायला मिळालं तर उत्तमच.
~गणेश