प्रा. डॉ. जयवंत इंगळे
____________
९७६७५२०४८२
१. दीप
वेदनांचा भार मी पेलीत गेलो;
पेटते काळीज सांभाळीत गेलो !
मी दिल्या नाहीत हाका पौर्णिमेला
मी पहाटेलाच धुंडाळीत गेलो.
मागताना भाकरी सारे पळाले;
भाकरीचा चंद्र मी शोधीत गेलो.
राख घरट्यांची इथेही पाहिली मी
काळजाला कोठरे बांधीत गेलो.
वेढला हा देश सारा वादळांनी
एकतेचा दीप मी लावीत गेलो.
२. बाजार
माझियासाठी सुना बाजार होता;
श्वापदासाठी खरा संसार होता.
पेटली होती जरी ही जिंदगानी;
आसवांचा केवढा आधार होता!
ऐकला नाहीस माझा हुंदका तू ?
हुंदका माझाच अब्रूदार होता.
झोपडी पाहून माझी चंद्र गेला;
माझियासाठी असा श्रृंगार होता!
ते म्हणाले 'वाहवा' हासून खोटे;
तो प्रशंसेचा जुना आजार होता.
मी कशासाठी तुझी केली गुलामी ?
हे जगा, तोही जिवाला भार होता.
३. लोक
कंगाल जिंदगीला हासून लोक गेले;
या पांगळ्या मनाला टाकून लोक गेले.
वस्तीत माणसांच्या आता कशास जाऊ ?
रस्त्यात श्वापदांच्या सोडून लोक गेले.
गेलो बुडून सारा माझ्याच आसवांनी;
पाहून आसवांना नाचून लोक गेले.
'आता कसे जगू मी ? ' लोकांस प्रश्न केला;
'सोशीत जा व्यथांना' सांगून लोक गेले.
वाचू कशास गाथा वैराण आसवांची ?
मागेच आसवांना वाचून लोक गेले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा