१६ ऑक्टोबर, २०१०

आठ गझला : गंगाधर मुटे


गंगाधर मुटे
__________


१. प्राक्तन फिदाच झाले

प्राक्तन फ़िदाच झाले यत्नास साधताना;
मोती पुढ्यात आले वाळूस गाळताना.

हलक्याच त्या हवेने का कोसळून जावा ?
हेका उगीच होता तो स्तंभ बांधताना.

पिकल्या फ़ळास नाही चिंता मुळी मुळीची;
दिसलेच ना कधीही हितगूज सांगताना.

शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली;
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळतांना.

द्रव्यापुढे द्रवीतो का कायदा म्हणावा?
नेमस्त गांजलेले कानून पाळताना.

आता ‘अभय’ जगावे अश्रू न पाझरावे;
आशेवरी निघावे ही वाट चालताना.

२.आभास मीलनाचा..

केंव्हा तरी कशाचा हलकेच भास झाला;
आभास मीलनाचा पळभर मनास झाला.

शून्यात पाहतांना हळुवार लाजली ती;
दृश्यात मी असावा, माझा कयास झाला.

तू लांब दूरदेशी, ना रूप जाणतो मी;
मुर्ती मनी तरळली, कलिजा खलास झाला.

पाडातल्या फ़ळांना का आस पाखरांची?
येता थवे निवासा, मग मेळ खास झाला.

विरहात वृक्षवल्ली निघुनी वसंत जाता;
बघता तया विलापा पक्षी उदास झाला.

प्रेमा सदा भुकेली ‘अभये’ सजीव माया;
निष्काम ज्या उमाळा तो प्रेमदास झाला.

३. कसे अंकुरावे अता ते बियाणे?

भुईला दिली ओल नाही ढगाने;
कसे अंकुरावे अता ते बियाणे?

दशा लोंबतांना तिच्या लक्तरांच्या;
कुणी का हसावे? कुबेराप्रमाणे.

दगाबाज झाले तुझे शब्द सारे;
अता हे फ़ुकाचे कशाला बहाणे?

निखारे विझूनी कशी राख झाली?
अता चेतवू मी मशाली कशाने?

तिजोरी कुणाची उधळतो कुणी तो;
अमर्याद झाली तयांची दुकाने.

नको रत्न मोती न पाचू हिरे ते;
’अभय’ ते खरे जे मिळविले श्रमाने.

४.अय्याशखोर

मेंदू उगाळतांना माणूस थोर झाला;
पंडीत कायद्याचा बाजारखोर झाला.

कंकाल हा नराचा जाणीव लोपलेला;
माणूस धर्म ज्याने खुंटीस टांगलेला.

भंगार तो तनाचा अय्याशखोर झाला

का ग्रासते मनाला झंकार कंकणाचे;
फ़ंदात मोहिनीच्या साधू छचोर झाला.

नसतेच जे मिळाले केंव्हाच सातजन्मी;
ते सर्व प्राप्त होता नेता मुजोर झाला.

‘कैवार गांजल्याचा’ तो डावपेच होता;
अधिकार प्राप्त होता अन्यायखोर झाला.

का पारखा मनुष्या, मानव्यतेस तू रे;
त्यागून कर्मधर्मा, ‘अभये’ अघोर झाला.

५.सत्ते तुझ्या चवीने

सत्ते तुझ्या चवीने नेते चळून गेले;
कुरवाळती कुणाला, कोणा छळून गेले.

सारे मिळून भेदू, हा व्यूह ते म्हणाले;
मी एकटाच लढतो, सारे पळून गेले.

कित्येक चाळण्यांनी, स्वत्वास गाळले मी;
उरलीय चित्तशुद्धी, हेवे गळून गेले.

समजू नको मला तू विश्वासघातकी मी;
पाऊल सरळ होते, रस्ते वळून गेले.

आता इलाज नाही, नाहीत मलमपट्ट्या;
मजला कळून आले, तुजला कळून गेले.

वणव्यात कालच्या त्या, काही उडून गेले;
काही बिळात घुसले, बाकी जळून गेले.

का सांगतोस बाबा ‘अभया’स कर्मगाथा
द्रवलेत कोण येथे, कोण वितळून गेले?

६.ती स्वप्नसुंदरी

सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी;
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी.

जोपासतो अशी ही आम्ही समानता;
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी.

जोडे सजावटीला एसी-कपाट ते;
भाजी-फ़ळास जागा, मात्र उघड्यावरी.

मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका;
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी.

जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी;
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी.

खेड्याकडून जावे शहराकडे जसे,
आकार घटत चोळी, जाते सरासरी.

शेती करून मालक होणेच मुर्खता;
सन्मान मोल आहे कर ‘अभय’ चाकरी.

७.कुंडलीने घात केला

कसा कुंडलीने असा घात केला;
दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला.

असे वाटले की शिखर गाठतो मी;
अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला.

विचारात होतो अता झेप घ्यावी;
तसा पाय मागे कुणी खेचलेला.

खुली एकही का, इथे वाट नाही;
हरेक पथ येथे कुणी हडपलेला?

पटू संसदेचा, तरी दांडगाई;
म्हणू का नये रे तुला रानहेला?

दिशा दर्शवेना, मती वाढवेना.
कसा मी स्विकारू तुझ्या जेष्ठतेला?

‘अभय’ चेव यावा अता झोपल्यांना;
असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला.

.स्मशानात जागा हवी तेवढी

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?

पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती?
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?

तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला;
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे?


जरी सत्य तू बोलशी मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?

कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा;
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?

कसा व्यर्थ नाराज झालास आंब्या, वृथा खेद व्हावा असे काय ते;
फ़ळे चाखण्याचेच कौशल्य ज्याला, तया ओलणे ते जमावे कसे?

शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन गेली, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?

‘अभय’ काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी;
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन्‌ वसावे कसे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: