Related Posts Plugin for WordPress, Blogger...

१६ ऑक्टोबर, २०१०

पाच गझला : सुधीर राऊतप्रा.सुधीर राऊत
_________
९४२२७९२६११

१.सराव

आहे अटारण्यांना भारीच भाव येथे;
बोटावरी तयांच्या नाचे जमाव येथे.

मांडू नको तुझे रे येथे इमान वेड्या;
बाजार चोरट्यांचा कोणी न साव येथे.

गेली खचून आता येथील लोकवस्ती;
धर्मांध राक्षसाचा चालू उठाव येथे.

लागे न आज त्यांना कुठलीच औषधीही;
मेल्यावरीच जाती ऐसे स्वभाव येथे.

माणूस आज चिरडू मुंगी समान आम्ही;
देवास कापण्याचा आम्हा सराव येथे.


२.झरोका

धर्मांध या पिढ्यांची आहे सुरू हमाली;
का तोडण्यास बेड्या कोणी न माय व्याली.

केलाय संप आता रक्तात लेखण्यांनी;
गेली विरून त्यांच्या शब्दांतली खुशाली.

सांगून कृष्ण गेला या अर्जुनास आता;
होऊन तूच शकुनी उलथून टाक चाली.
शेले तयार ठेवा युद्घातल्या विरांनो;
येता प्रसंग बाका होती फितूर ढाली.

शोधावयास गेलो माणूस त्यात जेव्हा;
डोक्यात या पिढीच्या ग्रंथालये निघाली.

अन्याय खूप झाला अंधार कोठडीचा
पाडा असा झरोका येईल सूर्य खाली.


३.कास

टांगून आज जुलमी कवितेस फास आहे;
द्वेषी सिंहासनाचा होणार र्‍हास आता.

लाजे दवात अजुनी प्रतिबिंब पाकळ्यांचे
ह्या झिंगल्या हवेचा चालूच रास आहे.

शहरात सापळ्यांचा बाजार खूप झाला;
रक्तास शोषणारा नेताच डास आहे.

ही थांबवा तयांची आत्ताच घूसखोरी
धोका अखेर त्यांचा भावी पिकास आहे.

रंगून मैफलीला गाऊ नकोस वेड्या;
दु:खी अखेर सगळा श्रोता उदास आहे.

जाळून रोज जाते ही भूक माउलीला;
तोंडात तान्हुल्याच्या नुसतीच कास आहे.

४.सांब

आशेवरी पिकाच्या जगतो अजून मी;
दुष्काळल्या जमीनी फुलतो अजून मी.

पाषाण ठोकळा तू समजू नको मला;
सोसून घाव ताजे घडतो अजून मी.

शोधात नोकरीच्या झिजवीत उंबरे;
पदवीत कागदाच्या कुजतो अजून मी.

पाडू नकोस देवा मोहात रे तुझ्या;
नादात अंतरीच्या रमतो अजून मी.

शेतात योजनांच्या तुम्ही चरा सुखे;
भोळाच सांब बापा फसतो अजून मी.


५. माणसे

भाषणांनी कुण्या नासली माणसे?
माणसांनी कशी कापली माणसे?

सांगती ज्ञान गीता-कुराणे जरी
धर्मवेडी तरी भांडली माणसे?

बांधले राजवाडे दिमाखात पण
पायव्याला किती गाडली माणसे.

नांदली कालची शांततेने पिढी;
आज रक्तात ही नाहली माणसे.

जाळले मारले लोक देशी किती;
ऐकुनी आकडे हापली माणसे.

बांधती-तोडती प्रार्थनांची स्थळे;
देवतांनी कुण्या शापली माणसे.

वाढलो रोज छायेत ज्यांच्या सुखे;
राहिली ना अता आपली माणसे.

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP