खलील मोमीन
८९७५०४४३५४
१. भर
भावले न तिजला हे शब्दांचे घर अजून;
अक्षरास म्हणते ती, व्यर्थाची बर अजून.
धन्यतेस बसला तू तृप्तीने जोजवीत;
मी न दिला कसलाही श्रद्धेला वर अजून.
वृत्त, छंद ,यमकांची छत्री का रे करात;
काय सांग पडली का ऊर्मीची सर अजून?
ना मुळीच भिजले रे गाण्याने अंतरंग;
वेदनेस भिडला ना खर्जाचा स्वर अजून.
बावरून म्हणते ती अंगाला चाचपीत;
रे तुला न चढला त्या ध्यासाचा ज्वर अजून!
तापलास म्हणतो ना वाफेचा होत मेघ;
रिक्त सांग दिसते का माझे अंबर अजून?
प्रेम फार हलके ते वा-यानेही उडेल-
त्यात घाल विरहाच्या दु:खाची भर अजून!
२. वैरी
जपले विकार वैरी;
झालेत यार वैरी.
मोहावरीच आला,
होऊन स्वार वैरी.
गाफील राहिल्याने,
धरतो शिकार वैरी .
म्हणणे सखा सुखाला;
ठरतो विचार वैरी .
तुलनेत दु:ख तैसे,
असते सुमार वैरी.
भलताच आढ्यतेचा
असतो विखार वैरी .
विळख्यात घेरतांना
दिसतो उदार वैरी.
तो मोडण्याचसाठी,
करतो करार वैरी.
असली करीत नाही,
पाठीत वार वैरी .
तो थोर,मानणारा-
फासास हार वैरी .
सत्यास रोखतांना,
थकले चिकार वैरी
न्यावेत का सवे हे,
असले उधार वैरी.
३. विरक्त
म्हणू नकोस ते कसे कधी मला जमायचे;
फुलासमान वाग तू जमेल घमघमायचे.
खुणावतेय ते तुला तरी पुढेच धावते;
अशा सुखास गाठण्या उगाच का दमायचे?
तयार उत्तरे जरी नकोच आढ्यता उरी;
समोर प्रश्न ठाकता तया पुढे नमायचे.
बघून घे नभास त्या अलिप्त सर्व व्यापुनी;
विरक्त राहुनी तसे जगात या रमायचे.
दिव्यात तेल-वात, हा तसाच जन्म आपुला;
तमास पेलण्यास या जळून रे शमायचे!
४.शोषण
कावळा त्यांनी असा केला पराचा;
लादण्यासाठी पुन्हा बोझा कराचा.
पूर्तता नाहीच वा ताबा दिलेला;
कापला जातो तरी हप्ता घराचा!
पाहिली होती वधू,ही वेगळी का?
प्रश्न आता व्यर्थ आहे या वराचा.
ओढुनी काडी तयांच्या व्यर्थ बोंबा;
पेटणे हा दोष नाही कापराचा.
संयमाची हद्दही माहीत नाही;
सोसणे हा अर्थ आहे पामराचा.
ही कशी पूजा ?नव्हे ही अंधश्रद्धा;
त्यामुळे उच्छाद चालू वानरांचा.
बांधण्या घंटा गळी कोणी धजेना;
खायचा हा खेळ चालू मांजरांचा.
५.शौर्य
लोभ ऐसे पात्र जे नाहीच भरण्यासारखे ;
आळशाला काय आहे काम करण्यासारखे ?
त्या सुखासाठीच धावाधाव सगळी चालली;
मात्र बोटांनीच ते पाऱ्यास धरण्यासारखे .
संकटे येतात त्यांना तोंड असते द्यायचे ;
जीवनी ही वेदना ना दु:ख सरण्यासारखे .
कस्तुरी कोठे मृगाला हाय कळले ना कधी;
शोधण्या ती धावणे वेडेच ठरण्यासारखे .
दाम घामाचा मिळावा मान्य असली मागणी ;
लाच घेणे वाटणे घाणीत चरण्यासारखे .
वाम मार्गाची कमाई भार ठरणे या जागी-
फक्त सत्कर्मे ,दया ते प्रेम तरण्यासारखे.
दुर्बलांना ठेवणे वेठीस कसले शौर्य ते;
जिंकणे त्याला म्हणावे युद्ध हरण्यासारखे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा