१६ ऑक्टोबर, २०१०

पाच गझला : कैलास गायकवाड




डॉ.कैलाश गायकवाड
_____________
९००४९३३७७३

१. मारला गेलो


जिथे जिंकायचे होते तिथे मी हारला गेलो;
जगायाचे जिथे होते तिथे मी मारला गेलो.

जिणे संपायला आले तरी सजलो कधी नाही;
कसा सरणावरी आता असा शृंगारला गेलो?

असा कंटाळलो होतो स्वतःच्याही तराण्यांना;
जशा तू छेडिल्या तारा, पुन्हा झंकारला गेलो.

मवाळा सारखा होतो परी अन्याय मोडाया;
न होतो साप मी कैसा तरी फुत्कारला गेलो?

अलभ्यच लाभ मी वदलो घरी आल्या रिपूलाही;
पहा माझ्या घरी कैसा सदा दुत्कारला गेलो.

तसा गोंडस जरी नाही तरी त्या सुस्वभावाने;
सदा '' कैलास '' मी तान्ह्या परी गोंजारला गेलो.


२.जोखड


झाला विरह अता मी, रडणार फक्त आहे.
अश्रू मुळीच नाही, ढळणार रक्त आहे.

बाहेर येउनी ना, दुःखास दर्शवावे;
अश्रूंस पापण्यांची, ताकीद सक्त आहे.

जाणीव पातकाची ,घडवी बदल असा की
सैतान कालचा तो , आता विरक्त आहे.

आशेवरी जगावे, हे फक्त आठवावे;
येणार जो उद्या तो, माझाच वक्त आहे.

देऊ कशी लढाई, निष्ठूर प्राक्तनाशी?
दुबळे प्रयत्न माझे , अन ते सशक्त आहे!

जो वागवी मनावर , जोखड तुझ्या मनाचे;
` कैलास'तो असावा, मी मात्र मुक्त आहे.



३.वाटते बोलायचे राहून गेले

आपले गाणे पुन्हा गाऊन गेले;
भेटले जे,ते चुना लावून गेले.

हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा,
पोट भरलेले,तरी खाऊन गेले.

विश्वसुंदर स्त्री करी अद्भूत किमया;
आंधळे आले ,तिला पाहून गेले.

मतलबी झालो इथे मी, काल जेव्हा;
आप्त माझे पाठ मज दावून गेले.

माफ केले पाप ते सारे तुझे मी;
आसवांसमवेत जे वाहून गेले.

पक्ष कसले?काय्?हे कळते न ज्यांना,
आपला झेंडा इथे लावून गेले.

जाहले 'कैलास' सारे सांगुनी पण,
वाटते,'बोलायचे राहून गेले'!


४. शेवटी


वाटते व्हावे न केव्हा,तेच झाले शेवटी;
सांत्वनाला माझिया,शत्रूच आले शेवटी.

हाव केली त्या क्षणी,काही मला ना लाभले;
निर्विकारी जाहलो,सारे मिळाले शेवटी.

लोक दगडासारखे,कोमल हृदय माझे इथे;
लाख मी सांभाळले पण्,वार झाले शेवटी.

भिस्त माझी खास होती,ज्या कुणा मित्रांवरी;
लोटुनी मज संकटी,तेही पळाले शेवटी.

देतसे व्याख्यान दारुबंदि वरती जे कुणी,
पाहिले त्यांच्याच मी,हातात प्याले शेवटी.

भार मी वाहून ज्यांचा,दुखविले खांदे सदा;
तेच मम खांदेकरी होण्यास आले शेवटी.

जन्म गेला हा तुझा 'कैलास' पुष्पांच्या सवे;
घेतले हातात का बंदूक भाले शेवटी?


५. धर्म

संपले जीवन कळाला धर्म नाही;
हेच तर माझ्या सुखाचे मर्म नाही?

आरती अन वंदनाही सारखी मज;
गर्व वाटे सांगताना , शर्म नाही.

धर्मवेडा लोक म्हणती टोचुनी पण
घाव केले ज्या स्थळी ते वर्म नाही.

धर्म मार्तंडा पहावे झाकुनी तू;
सांग तू केले कधी दुष्कर्म नाही?

नागडा मी जाहलो धम्मा समोरी;
का तरी 'कैलास' तू बेशर्म नाही?







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: