वंदना पाटील
__________
९४२२४४९८५९
१.
मी तुला पाहिले जेव्हा त्या वळणावर वळतांना;
तू कुठे पाहिले होते, मन माझे तळमळतांना.
जाळले जरी ग्रीष्माने मी केली नाही चिंता;
हे श्वास सुगंधी माझ्या भवताली दरवळतांना.
तो हळवा दिवस कळ्यांचा, ती फसवी रात्र फुलांची;
हा गंध कोणता येतो जखमांतुन भळभळतांना.
सावलीस कळल्या कोठे यातना उन्हाच्या तेव्हा;
सांगती अजुन बकुळीची पानेही सळसळताना.
शोधल्या नव्या वाटा तू, भरवसा कसा मी ठेवू?
तू हाक ऐकली कोठे हे काळिज कळवळताना.
मी उगा कुणाला दावू तळहातावरच्या रेषा;
मज दैव भेटले माझे वाटेतच अडखळताना.
समजावुन समजत नाही हे हृदय दिवाणे माझे;
तू येशील म्हणुन उठलो, बघ सरणावर जळताना.
२.
दु:ख माझे संयमाने सोसतो आहे जरी;
या जगाला का कळेना बोचतो आहे तरी.
मी म्हणे त्यांच्यामधे का मिसळलो नाही कधी;
मी बरा, एकांत माझा, लेखणी माझी बरी.
रोज ते देती अता जखमा मला येथे नव्या;
का तरी मी वार त्यांचे झेलतो अंगावरी.
कालच्या त्या वादळाने मोडले घरटे इथे;
आज त्यांच्या अंगणी झाली दिवाळी साजरी.
आपले समजून मी काट्यासही कवटाळले;
का गडे वेडी फुले ही हासली वेड्यापरी.
दु:ख त्यांचे डोंगरी अन गारठा त्याचा किती;
वेदनांची शाल मी ही ओढली अंगावरी.
1 टिप्पणी:
तो हळवा दिवस कळ्यांचा,ती फ़सवी रात्र फ़ुलांची;
हा गंध कोणता येतो जखमांतुन भळभळतांना
व्वा. मस्त शेर
दोन्ही गझला सुंदर.
टिप्पणी पोस्ट करा