७ ऑगस्ट, २०११

सारे जहाँ से अच्छा हिंन्दोस्था हमारा : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'















प्रिय रसिक,

'हर हाल में खुश रहने की आदत दे इलाही
नादान हूँ मुझको, नसीहत दे इलाही
इन्सान को इन्सान बनाने मे लगा हूँ
ये काम है मुश्कील मुझे हिम्मत दे इलाही।।

अशा प्रकारचे, माणसाला माणूस बनविण्याचे कठीण काम करणारा एक क्रांतिकारी शायर भारतात होऊन गेला. त्याला उर्दू जगत अल्लामा इकबाल या नावाने ओळखते. डॉ.अल्लामा मुहम्मद इक्बाल यांना शायर-ए-मशारिक पूर्व देशाचा शायर असेही म्हटले जाते.
इकबाल यांचा जन्म १/११/१८७७ मध्ये सियालकोट (पाकिस्तान)मध्ये झाला. त्यांचे पूर्वज काश्मिरी ब्राह्मण होते आणि ३00 वर्षापूर्वी मुसलमान झाले होते. सियालकोट येथे बी.ए.तत्वज्ञानाची शिक्षा प्राप्त केली आणि इक्बाल त्याच काळात नज्म व गझल लिहावयास लागले. वयाच्या २३ व्या वर्षी लाहौर येथील मुशायर्‍यात एक गझल त्यांनी सादर केली. तिचा शेर होता.
'मोती समझ के शाने करी मी ने चून लिये
कतरे जो थे मिरे अर्के इनफआल के।।

म्हणजे पश्‍चातापदग्ध झाल्यावर माझ्या कपाळावरून टपटप जमिनीवर पडणारे घामाचे थेंब प्रत्यक्ष परमेश्‍वराने मोती समजून ओंजळीत भरून घेतले. त्या मुशायर्‍यात त्या वेळचे प्रख्यात उर्दू शायर मिर्झा अरशद गोरगानी उपस्थित होते. हा शेर ऐकून ते म्हणाले 'सुभान अल्ला, साहबजादे इस उम्र मे ये शेर!' पुढे इक्बालची शायरी बहरत गेली. इक्बाल आपल्या काळातील सर्वात 'जहीन' (बुध्दिमान) शायर होते. त्यांनी लंडन येथील कॅमब्रीज युनिव्हर्सिटीमध्ये तत्वज्ञानात पीएचडी केली. भारतात परत आल्यावर म्हैसूर व हैद्राबाद येथील विद्यापीठात लेक्चरर म्हणून नियुक्त झाले. अल्लामा इक्बाल यांनी प्रचंड लिखाण केले. मानवी जीवनाला उंचीवर नेणारा, मानवी अस्मितेवर त्यांचा हा अप्रतिम शेर-
'खुदी कर बुलन्द इतना के हर तहरीर से पहले
खुदा खुद बन्दे से पुछे, बता तेरी रजा क्या है?

हे माणसा स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:ला एवढय़ा उंचीवर ने की प्रत्यक्ष परमेश्‍वराने तुला विचारावे- सांग तुझी इच्छा काय आहे. तुझ्या नशिबात काय लिहू? बांगेदिरा, बाल ए जिब्रील, जबॅ कलीम ही त्यांची काही उर्दू पुस्तके आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे हे वैशिष्ट्य़ म्हणावे लागेल. ज्याने रघुपती सहाय फिराकसारखा हिंदू शायर उर्दूला दिला. ज्याने मुहम्मद पैगंबरावर स्तुतीपर काव्य लिहिले तर डॉ.इक्बाल यांची 'रामा'वरील ही कविता सुप्रसिद्ध आहे.
लबरेज है शराबे हकीकतसे जाम ए हिन्द
सब फलसफी है खित्त-ए-मगरिब के राम ए-हिन्द

म्हणजे हिन्दुस्थानाच्या जीवन तत्वज्ञानाचा हा प्याला या शाश्‍वत सत्याने भरलेला आहे की, पश्‍चिमेला जीवन कसे जगावे, याचा पाठ शिकविण्यासाठी हिन्दुस्थानचा 'रामच' पुरेसा आहे.
'है राम के वजूद पे हिन्दोस्था को नाज
अहले नजर समझते है उसको इमाम-ए-हिन्द'

रामच्या जीवनशैलीवर आम्हा भारतीयांना गर्व आहे. राम आमच्या जीवनाचे नेतृत्व करणारा आमचा नेता आहे.
डॉ.अल्लामा इक्बाल यांनी फक्त एकच गीत लिहिले असते तरी भारतीय समाजमनात व विश्‍वात ते अजरामर झाले असते. ते गीत म्हणजे.
'सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्था हमारा
हम बुलबुले है उसकी, ये गुलसिता हमारा।।
मजहब नही सिखाता आपस में बैर रखना
हिन्दी है हम वतन है हिन्दोस्था हमारा।।
युनान वो मिस्त्र वो रोम सब मिट गये जहाँसे
अबतक मगर बाकी है, नामो निशा हमारा।।

आपण प्रगतिशील शायरीच्या आंदोलनाचा जेव्हा विचार करतो तेव्हा फैज अहमद फैज, अली सरदार जाफरी, कैफी आजमी, मजरूह यांची नावे डोळ्यांसमोर येतात. परंतु त्यांच्या आधी त्याची मुहूर्तमेढ कुणी रोवली असेल तर डॉ.इक्बाल यांनी. त्यांची ही कविता बघा.
नया शिवाला (नवी शिवमंदिर)
सच कहु तो ऐ ब्रहमन गर तु बुरा न माने
तेरे सनम कदे के बूत हो गये पुराने

'हे ब्राम्हणा, तुला राग येणार नसेल तर खरे सांगू तू ज्या मंदिरात रोज पूजा करतो तेथील मूर्त्या आता जुन्या झाल्या आहेत.
'पत्थर की मूरतो में समझा है तु खुदा है
खाके वतन का मुझको हर र्जरा देवता है।।
सुनी पडी हुयी है मुद्दत से दिल की बस्ती
आ एक नया शिवाला इस देश मे बना दे।।
दुनिया के तीरथ से उंचा हो अपना तीरथ
दामने आसमॉ से इसका कलश मिलादे।।
हर सुबह उढके गाये मंतर वे मीठे मीठे
सारे पुजारीयों को मय प्रीत की पिला दे।।

डॉ.इक्बाल एक द्रष्टा, दूरदृष्टी असणारा बुध्दिमान शायर म्हणून ओळखला जातो. अखंड भारताचा पुरस्कार करणारे इक्बाल यांनी जेव्हा बॅरिस्टर जीनांचा व्दिराष्ट्रवादाचा सिध्दांत ऐकला त्यावेळी ते निराश झाले. त्या काळात जे वातावरण सुरू झाले, हिंदू मुस्लीम विभागल्या गेले. त्या वेळेस त्यांनी ज्या ओळी लिहिल्या त्या आजही प्रासंगिक वाटतात-
वतन की फिक्र कर नादा मुसीबत आनेवाली
तेरी बर्बादीके मशविरे है आसमानोमे
न समझोगे तो मिट जाओगे ए हिन्दोस्थावालों
तुम्हारी दास्ता तक न होगी दास्तानोमें।।

आज घोटाळ्याच्या, अराजकतेच्या, अन्यायाच्या वातावरणात आपण अंतर्मुख होऊन विचार करायला हवा अशा ह्या ओळी आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: