८ ऑक्टोबर, २०११

रविप्रकाश : तीन गझला




१.



व्यथाराणी



सुखाने हाय जगण्याला किती छळले व्यथाराणी;


तुला टाळू नये कोणी मला कळले व्यथाराणी.



फुले व्हावीत अश्रूंची असे तेव्हा ऋतू होते;


तिच्या स्मरणात रडण्याचे दिवस ढळले व्यथाराणी.



कुणी समजावुनी सांगा अता या सांत्वनालाही;


रुमालाने पुन्हा अश्रू किती जळले व्यथाराणी.



सुखाच्या चक्रव्यूहाने मलाही घेरले होते;


सुखाने मारले असते,मरण टळले व्यथाराणी.



कधी मी मांडला नाही गडे आकांत जन्माचा
;


युगाचे कोरडे अश्रू कुठे गळले व्यथाराणी?



महालातून रस्त्यावर सखी आली जराशी तर;


फुलांचे पाय मातीने म्हणे मळले व्यथाराणी.



प्रतीक्षा फोडते डोळे,छळे अंधार जन्माचा;


पुन्हा दारात अश्रूंचे दिवे जळले व्यथाराणी.



२.



जीवन



जरी चालतांना तुला वाट डसते;


तुझ्या पावलांना फुटो राजरस्ते.



तिच्या सावलीला बसा सूर्यदेवा;



कळू द्या तुम्हाला, कशी माय असते.


तिच्या सोसण्यावर रडे वेदनाही;



तिच्या दिल्लगीवर किती दु:ख हसते.



तवंगापरी मीपणा वर तरंगे;


बुडाल्याविना काय जीवन समजते.



३.



मॅडम



एकांत शाप असतो केव्हा कळेल मॅडम;


भर पावसात सारी काय जळेल मॅडम.



कुठल्या नशेत तुजला मी पाहिले कळेना;


आयुष्यभर तुझ्या मी मागे पळेल मॅडम.



तुमच्यात एक मुलगी हसते म्हणे निरंतर;


तुमचा झरा कधी हो वर खळखळेल मॅडम.



क्रोधाग्नि तो कुणाचा शृंगार होत नसतो;


हसुनी कटाक्ष टाका,सागर जळेल मॅडम.



देहामधेच बसतो लपुनी भुकंप कैसा;


तुम्हास वयपरत्वे हेही कळेल मॅडम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: