दैवास जाणले मी, दैत्यास काय सांगू?
सृजनात हारले मी, मरणास काय सांगू?
मज भेटू दे किनारा, नौका जलास बोले
खोली किती तळाची, पाण्यास काय सांगू?
दे घाव दे सुखाने, तू जीवनास माझ्या
वेड्या, तुझेच आहे, हे श्वास! काय सांगू?
कुसुमास ना कळावे, नाते मृदूलतेचे?
मग बोचणे मनाचे, काट्यांस काय सांगू?
काळी छटा कुणी ही विश्वास ओढलेली?
’माणूस" शोधते मी! दगडांस काय सांगू?
ठेवू किती अता मी हृदयात चाहत्याला?
जागा मलाच नाही, स्वत:स काय सांगू!
धृवापरीच आहे आकाश चांदणी मी
ढळतेच ना कधीही, सूर्यास काय सांगू?
हे विझवले निखारे, आताच शांततेने
"आता हळू वहा रे" वा-यास काय सांगू?
सांगू नकोस काही, आधीच रे मना तू
तो "डाव" शेवटाचा, तेव्हाच काय सांगू!!
केव्हातरी कुठेशी भेटीन एकटी मी
बोलेन काय तेव्हा, आतास काय सांगू?
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा