८ ऑक्टोबर, २०११

अरुण तिकटे : तीन गझला










१.



जीवनाशी गडे बोलतो




जीवनाशी गडे बोलतो,चालतो;


वाट मी एकटा थांबतो,चालतो.



काय होतो कधी? काय मी आज हा?


या विचारासही टाळतो,चालतो.



आज लपला कुठे,देव गेला कुठे?


एक माणूस तर मागतो,चालतो.



पावसाळे,हिवाळे,उन्हाळे किती


जीवनाचे ऋतू साहतो,चालतो.



यायचे राहिले दु:ख माझ्यासवे;


पावलांच्या खुणा सोडतो,चालतो.



२.



चार तुकडे भाकरी



चार तुकडे भाकरी


जीवनाला पोखरी.



जातपात नि धर्म ही


माणसांमधली दरी.



अंत आल्यावर वदे


श्रीहरी रे श्रीहरी.



चेहरे लपले किती


माणसाच्या अंतरी.



शेवटी दूरावली


दूरची होती परी.



३.



जीवनाच्या व्यथा साहतांना




जीवनाच्या व्यथा साहतांना;


हाक देतो उगा माणसांना.



साद ऐकू न आली मला की


रोखले तू तुझ्या पावलांना.



ऐक आता जरा लाज यावी,


माणसा तू तुला मारतांना.



अंतरी एक सल सलतसे हा-


चूक झाली तुला जाणतांना.



काळजाशी व्यथा दाटल्या की


वाट देतो अता आसवांना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: