७ ऑक्टोबर, २०११

विद्यानंद हाडके :एक गझल








रुढी परंपरेचा का बांधलास शेला



रुढी परंपरेचा का बांधलास शेला?
या मानवी जगाच्या टाळून सभ्यतेला

येथील संस्क्रुतीला मी हा सवाल केला
वस्तीत माणसांच्या माणूस का भुकेला?

काबा नको न काशी बस हाक द्या स्वत:ला
अन जागवा जरासे अपुल्याच अस्मितेला

सूर्यास जाग यावी गावाकुसात अमुच्या
येथे युगायुगाचा अंधार दाटलेला

ज्यांना हवाच होता काळोख भोवताली
देतील दोष ते मग या तांबड्या दिशेला

मी मिळविले कितीदा हातात हात ज्यांच्या
सोडून हात माझा जो तो निघून गेला

बोलू कसा कुणाशी? मज प्रश्न ग्रासतो हा
एकेक शब्द माझा कंठात दाटलेला

दिसती कसे मला हे सारेच शांत येथे
माणूस शोधतो मी आतून पेटलेला.


vidyanand.hadke@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: