माळावरच्या दु:खांना या, घरात माझ्या पाळत बसलो
तुटला तारा निजले अंगण, उगाच अश्रू ढाळत बसलो
मनात काही चकाकले अन ,उरले हाती चुकलेले क्षण
सुटे ओंडका फुटे लाट मग, जुनी डायरी चाळत बसलो
होती सांगत मला भेट तू , आणि चकवा देवून गेली
टाळूनिया ती गेल्यावरती , भासावरती भाळत बसलो
हिरमुसलेली फुले सांगती, बागेला या नजर लागली
बाधा काढुन बहर शोधता अंगोंअंगी वाळत बसलो
पुसतील अश्रू नेते अमुच्या ,गालावरुनी ओघळणारे
मध्यमवर्गी स्वप्नांना मी, पुन:पुन: खंगाळत बसलो
यमदूतांना सांगे ' बापू ' ,उचला मजला चटकन आता
दूत लाजुनी दूर पळे अन, जीवाला या जाळत बसलो.
- bapu111@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा