७ ऑक्टोबर, २०११

मयुरेश साने : एक गझल









पुन्हा पुन्हा



मला कशास भेटती तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा;


तुझ्या परीच वागती तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.




पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा?


मला पुसून टाकती तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.



जरी तुझ्या सवेच मी तुझ्याच आसपास मी


उगाच वाट पाहती तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.



अजून चंद्र चांदण्या तुला मलाच शोधती


बनून स्वप्न जागती तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.



जुना रदीफ़ काफिया मुशायरा नवा पुन्हा


तशा नवीन भेटती तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.




जिवंत मी असा कसा मरून संपलो तरी


अजून श्वास पाळती तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: