९ ऑक्टोबर, २०११

मनिषा नाईक : सात गझला









.



काळास दोष नाही



काळास दोष नाही वेळाच थांबलेल्या


भाग्यातल्या सुखाच्या रेघाच खोडलेल्या



नात्यास मोल नाही नुसतेच नामधारी


गाठी कशा सुटाव्या जोरात बांधलेल्या



मी साद घालते ही फोडून आज टाहो


न्यायास जाग नाही मस्तीत झोपलेल्या



ना सांगणे कुणाला ना ऐकणे जगाचे


होत्या चुकाच सार्‍या ओळीत लावलेल्या



येतो कधी कधी हा दाटून कंठ माझा


रंगीत आठवांच्या वाटाच रोखलेल्या



पारायणेच केली मी रोजच्या व्यथेची


माझ्या कथेत काही जागाच गाळलेल्या



तो आसरा मिळावा मज कोणत्या दिशेला


दाही दिशा 'मनी'शी जात्याच भांडलेल्या




२.




काया सतार झाली



तू छेडले सख्या रे, काया सतार झाली


झंकारले अशी की, दु:खे पसार झाली



हे तीर फेकले तू, घायाळ हाय केले


भाळून आज गेले, कळ आरपार झाली



ओथंब आठवांचा, येतो कधी अवेळी


ही लाट भावनेची, माझ्यात स्वार झाली



ओठावरी गुलाबी ,मिटली कळी अबोली


ओशाळले अशी की,हृदयास धार झाली



डोळे तुझे शराबी,नजरेत पाजले तू


कैफात मी बुडाले, मदिरा फरार झाली



वेडाच जीव झाला, का चैन ही पडेना


माझीच ही तनू रे मजलाच भार झाली



ते शब्द ही जिव्हारी, हलकेच लागले रे


तेंव्हाच ही मनी रे, पुरतीच ठार झाली




३.




गाजली माझी कहाणी




आस वेडी भास वेडे आसवे झाली शहाणी


रात सारी जागलेली आठवांची बोल गाणी



भाव थोडे घाव थोडे बांधले घर वेदनांनी


डाव सारे मोडण्याची रीत त्याची ही पुराणी



मान नाही भान नाही चालले शोधीत वाटा


सोबतीला आज होती वादळांची ती तराणी



प्रीत गेली जीत गेली खेळले ते खेळ सारे


हार झाली ठार माझी संपली रे आज राणी



गाव गेले नाव गेले हासुनी ते साहिले ही


वाजला आत्ताच डंका गाजली माझी कहाणी



४.




शारदाची रात




ओळखीची बात आहे


शारदाची रात आहे .....



सांज येता पेटले रे


तू दिवा मी वात आहे ....




शोधिसी काळोख का रे


चांदण्यांची मात आहे ....



स्वप्न सारी राखणीला


आज हाती हात आहे .....


या सुरांना सूर शोधी


प्रेम गाणे गात आहे ....


यौवनाला बाज आला


टाकली मी कात आहे ...



कोरडासा चांदवा हा


चांदणी मी न्हात आहे ...



चाखली कोजागिरी तू


आज मी कैफात आहे



५.




तुझा खेळ सारा...




घरंदाज होता, तुझा खेळ सारा


सुखाने जळाया दिला तू निखारा



तुझ्या कुंपणाला अबोली हवीशी


व्यथेच्या कळ्यांना दिला देह वारा



कशा या तऱ्हा रे कसे वागणे हे


उगा आसुडाचा मला रोज मारा



झरा आसवांचा..उरी पाझरावा


मुक्या वेदनेला.. फुटावा धुमारा



झुकावे झुलावे झुला रोज व्हावे


जगावे जरी श्वास हा कोंडणारा



कशी आस वेडी फुलावी चुरावी


'मनी' च्या मनाचा सुटे धीर सारा




६.





आभास माझा



अजूनी सखे चालतो श्वास माझा


तुला शोधतो आज आभास माझा



कुठे पावलांचे खुळे नाद येती


तुझा दास होतो मुका ध्यास माझा



ठसे चांदण्यांचे नभाच्या तळाशी


जुन्या वेदनेचा नवा भास माझा


तुझ्या पावसाने मला पूर यावा


सडे कोरडा आज मधुमास माझा



खुले आम झाला असा घात मोठा


हसावा मला आज वनवास माझा



सखे या व्यथेची नशा आज झाली


सुखाने पहा ना जरा त्रास माझा




७.



सूर माझे संपले



आधार शोधू मी कुठे, अंधार होता दाटला


आशाच सारी संपली, तू काजवा ही झाकला......



हा मांडला नी मोडला तो डाव होता शेवटी


मी खेळला थोडाच होता खेळ तो ही गाजला.....



झाला पसारा आठवांचा सावरू आता कसे


हा आसवांचा डोह का डोळ्यात माझ्या साचला.....



मी सोबतीने चालले फेरेच नाही मोजले


बेरीज ती चुकली कशी संसार माझा फाटला ......



आता सख्या सांभाळ 'ताना' सूर माझे संपले


झंकारल्या तारा 'मनी'च्या राग ही मंदावला .......


________________________________


nmani15@gmail.com

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

अप्रतीम गझल्स...!!!