९ ऑक्टोबर, २०११

प्राजु : दहा गझला











१.



जा कुठेही मी उभा आहेच तुझिया स्वागता!!"


दु:ख म्हणते रोज मजला, त्यास बाजू सारता!




जिंकते आला दिवस भांडून नियतीशी जरी


झोपताना ना कधी मिळते मनाला शांतता




हासते मी, बोलते मी, दिवस सारा काढते


संपते अवसान उसने सांज दारी सांडता




चांदण्यानी गगन भरले, का रिते भासे तरी


वाटते कसली कमी जर चंद्र आहे नांदता??




'
दे सहनशक्ती मला!' देवास मी म्हटले पुन्हा


मागुनी आलेच नाही सौख्य मजला मागता




वेढले आयुष्य सारे खूप गोष्टींनी तरी


पोकळी उरते तुझे मी नाव देखिल गाळता




परसते मी पंख, घेण्याला भरारी या इथे


दाटूनी नभ सावळे बघ रोज घाली मोडता





२.



घाव जखमांचे जुन्या सांभाळणे आता नको


त्याच त्या घटनांतुनी रेंगाळणे आता नको





व्हायचे होऊन गेले, राहिल्या खाणाखुणा


परतुनी मागील जखमा चाळणे आता नको




पेटलेल्या भावनांचाही निखारा शांतला


होमकुंडी या मनाला जाळणे आता नको




झेलले ग्रीष्मास, त्याचा खूप झाला दुखवटा


गंधवेड्या पावसाला टाळणे आता नको




तीच यमुना, तोच पावा, त्याच गाई, माधवा!


तेच राधेचे तुझ्यावर भाळणे आता नको..!




पापणीच्या आत काही, ओठ काही सांगती!


मुखवट्यांच्या भोवती घोटाळणे आता नको




सोयरे अन आप्त माझे, मोजण्या पुरते जरी


जन्मभर कौतूक त्यांचे पाळणे आता नको




पाहिले मी रंग त्यांचे बदलणारे रोजचे


बेगडी रंगास भुलणे, भाळणे आता नको




३.




मागली पाने नको चाळू अता चल!!



पान पलटूनी पुढे जाऊ अता चल


घुटमळूनी तू नको राहू अता चल



बालपण निर्व्याज या पानी विसावे


सारखा वळुनी नको पाहू, अता चल



कितिक रेघोट्याच दिसती मारलेल्या


त्या चुका होत्या! नको मोजू, अता चल



पान भिजलेले जरासे फ़ाटलेले


जाउदे! त्याला नको जोडू अता चल



डाग पडला नेमका मधल्याच पानी


खरवडूनी त्या नको फ़ाडू, अता चला



ठाव ना निखळून गेली कितिक पाने


जी जवळ उरलीत, सांभाळू अता चल



'जायचे आहे पुढे!' जर हेच नक्की


मागली पाने नको चाळू, अता चल




४.




आभास हा तुझा की भुलवा जराजरासा



आभास हा तुझा की भुलवा जराजरासा


भांबावल्या मनाला, चकवा जराजरासा



तो ऊन- सावलीचा, कधि खेळ पावसाचा


होता ऋतू तुझाही, फ़सवा जराजरासा



ऐकून का विराणी, डोळ्यांत नीर दाटे??


झाला स्वभाव बहुधा, हळवा जराजरासा



ती सांज आसवांनी, भिजवून टाकली मी


अन चन्द्रही उगवला, रडवा जराजरासा



पत्रात तू लिहूनी, मजकूर धाडला जो


तो लाघवी जरा तर, रूसवा जराजरासा



तव वाट पाहताना, आसू कधी न आले


नयनांत दाटला पण, थकवा जराजरासा



टोचून बोलणे ना, ना भांडसी कधीही


पण सूर हा तुझा रे, कडवा जराजरासा




५.




देह होता तुझा.. चांदणे कालचे!!



आठवे का पुन्हा बोलणे कालचे?


बोलता मी जरा लाजणे कालचे!!



चालताना हळू बोट लावूनिया


हात माझा जरा स्पर्शणे कालचे



बघ शहारा असा रोमरोमातुनी


आठवे मज तुझे वागणे कालचे



भेग ही खोलवर काळजाला पडे


जीवघेणे तुझे हासणे कालचे



'काय समजू?'जरा सांग मज ना कळे


हासुनी उत्तरे टाळणे कालचे!!



मेघ, वारा, धरा, थांबले ऐकुनी


या जगा वेगळे मागणे कालचे



रातराणी कशी बहकलेली जरा


देह होता तुझा.. चांदणे कालचे!!



मोर ही थांबला पाहण्याला तुझे


पावसाच्या सवे नाचणे कालचे..







६.




कसा शोधु मी चांदवा कालचा??




कुठे सापडेना दुवा कालचा


कसा शोधु मी चांदवा कालचा??



खुणावीत होता दुरूनी मला


पुन्हा पाखरांचा थवा कालचा



अजूनी जिवाला पिसे लावतो


तुझ्या ओठिचा गोडवा कालचा



फ़िरूनी पुन्हा शिरशिरी आणतो


नि छळतो कसा गारवा कालचा



किती काळजाला जखम जाहली


तरी घाव वाटे हवा कालचा



सयी छेडती तार का अंतरी?


सुरांनो म्हणा मारवा कालचा



कुठे काफ़िया अन कुठे ती गझल!!


जरा शेर तो ऐकवा कालचा




७.




हृदय वेदनांचा सदा भार वाही



हृदय वेदनांचा सदा भार वाही


तरी आत सलते, तसे फ़ार नाही



जरासे हवे लाज झाकावयाला


नको भरजरी वस्त्र जरतार काही



भल्या मोठमोठ्या किती लांब गप्पा


तुझ्या बोलण्याला मुळी धार नाही



नको जाच मजला, सुरांचा, लयींचा


तसे गायला मी, कलाकार नाही!!



जरी पाहसी रोज चोरून मजला


तरी स्पष्ट दिधला तू होकार नाही



कधी ढग कधी खग, कधी हा कधी तो


मनाच्याच रेषा!! न आकार काही



किती वेगळे जन्म 'तू' घेतलेले


कलियुगात का घेत अवतार नाही ??




८.




भलती खट्याळ होती, ती रात पावसाची



भलती खट्याळ होती, ती रात पावसाची


कळली कधी मला ना ती जात पावसाची



पाहून एकटी मी, तो सरसरून आला


कसली अशी निराळी रितभात पावसाची??



विद्द्युल्लता जराशी, लाजून काय आली


झाली पुन्हा फ़िरूनी सुरुवात पावसाची



त्या पावसात भिजला चातक मलाच म्हणतो


'बसुनी पुन्हा करूया, चल बात पावसाची'



घेता मिठीत त्याने, सर कोसळून गेली


अन ओल ही नव्याने, श्वासात पावसाची!



मज भोवती सयींचे, दाटून मेघ आले


आधीच हा दुरावा, भर त्यात पावसाची!



आला मध्येच दडला,रंगांमधून हसला


मेघातली गुपिते , मज ज्ञात पावसाची



धुंदी अशी नभाची, धारांत सांडलेली


घेऊ नशा भरूनी, ग्लासात पावसाची




९.




असे लाघवी तू हसावे कशाला



असे लाघवी तू हसावे कशाला?


नि हृदयात काही हलावे कशाला?



मला ठाव असती बहाणे तुझे ते


खरे सांग लटके रूसावे कशाला?



तुझ्या पापण्यांनीच होकार दिधला


अता सांग दुसरे पुरावे कशाला?



तुझे भास मधुमास घेऊन येती


जुईली परी तू फ़ुलावे कशाला?



तुला बिलगण्याची मुभा पावसाला!!


तयाच्या सवे तू भिजावे कशाला?



तुला ठाव आहे, मला ठाव आहे


उगा औपचारीक व्हावे कशाला



असे साथ ही जन्मजन्मांतरीची


अता हे फ़ुकाचे दुरावे कशाला?




१०.




ओठास लावूनी जरा मी वेदनेला बोलले



बोलावितो आता पुन्हा का पाखरांचा हा थवा ?


का जोडते संबंध त्या वेड्या नभाशी मी नवा?



ओठास लावूनी जरा मी वेदनेला, बोलले


चाखून पाहू दे सुखाचा मज जरासा गोडवा!"



आकाश् दिसते लांब इतुके पंख माझे तोकडे


गरुडापरी घे‌ईन पण मी झेप!’- म्हणतो पारवा



शब्दातुनी मी काळजाचे वेचले तुकडे असे


माझी व्यथा त्या मैफ़िलित मिळवून गेली वाहवा!



वाटेवरी स्मरते पुन्हा त्याचीच कविता पण तरी


त्याच्या विना गा‌ऊ कशी, कोठून आणू सुर नवा??



आहे निघाली भावनांची प्रेतयात्रा या इथे


मुर्दाड व्हा आता मनाने... ढोलताशे वाजवा!!



प्राजूतुला कळलाच् कोठे ढंग दुनियेचा खरा!



दुनियेत,... वेडे,.. भोवती साधेपणाची वानवा!!


________________________________


  • praaju.patwardhan@gmail.com



३ टिप्पण्या:

Nitin Patwardhan म्हणाले...

प्राजक्ता पटवर्धन यांनी लिहिलेल्या सर्वा गझला अप्रतिम आहेत. मागली पाने चाळू आता चला
आभास हा तुझा की भुलवा जराजारसा. देहा होता तुझा चांदणे कालचे. कसा शोधू मी चंदवा कालचा
असे लाघवी तू हासवे कशाला. ह्या सर्वा अप्रतिम गझला आहेत. आणि त्यातील शब्दा पण अप्रतिम आहेत.त्यातले शब्द थेट हृदया पर्य़ंत भिडतात

Nitin Patwardhan म्हणाले...

प्राजक्ता पटवर्धन यांनी लिहिलेल्या सर्वगझला अप्रतिम आहेत. मागली पाने चाळू आता चला आभास हा तुझा की भुलवा जराजारसा. देहा होता तुझा चांदणे कालचे. कसा शोधू मी चंदवा कालचा असे लाघवी तू हासवे कशाला. ह्या सर्वा अप्रतिम गझला आहेत. आणि त्यातील शब्दा पण अप्रतिम आहेत.त्यातले शब्द थेट हृदया पर्य़ंत भिडतात

Aishwaryasmurti म्हणाले...

झेलले ग्रीष्मास, त्याचा खूप झाला दुखवटा
गंधवेड्या पावसाला टाळणे आता नको


तीच यमुना, तोच पावा, त्याच गाई, माधवा!
तेच राधेचे तुझ्यावर भाळणे आता नको..!


पापणीच्या आत काही, ओठ काही सांगती!
मुखवट्यांच्या भोवती घोटाळणे आता नको
Bahot aache.!!!!