९ ऑक्टोबर, २०११

स्वामीजी : उर्दू गझल : मराठी काव्यानुवाद










उर्दू गझल : मराठी काव्यानुवाद



उर्दू व हिन्दी भाषांमध्ये क्रियापदे दोन तुकड्यात लिहिली जातात व त्यांपैकी दुसरे सहयोगी क्रियापद आधीच्या मुख्य क्रियापदाचा अर्थ न बदलता अनेक क्रियांसाठी तसेच वापरले जाते. जसे "कर गया, हो गया, पा गया" या क्रियारूपांमधील "गया"चा "गेला" असा शाब्दिक अर्थ घेतला न जाता या क्रियारूपांचा मराठीत "केला/केले, झाला/झाले, मिळवले" असे अर्थ होतात. म्हणजे संयुक्त क्रियापदातील सहयोगी पद अर्थान्तर करीत नाही. आता असं एकच पद अनेक क्रियापदांना जोडलं जाऊ शकत असल्याने हिन्दी-उर्दू ग़ज़लमध्ये "रदीफ़" सांभाळणे सहजी शक्य असते. परन्तु मराठी क्रियारूपांमध्ये असे सहयोगी क्रियापद अर्थभेद करत असल्याने त्याचा रदीफ़ म्हणून वापर करता येणं शक्य नसतं. अशा वेळी केवळ "काफ़िया" सांभाळून शेर लिहिणं मराठी वाक्यरचनेच्या धाटणीनुसार सोयीचं जातं....! हा बारकावा लक्षात ठेवला तर मराठीत शेर लिहिणं जमू शकतं.

एका भाषेतून दुसऱ्या भाषेत काव्यानुवाद करताना शब्दानुवाद करण्यापेक्षा भाषेनुसार प्रतीके आणि प्रतिमांचा वापर करत भावानुवाद करणेच श्रेयस्कर ठरते.

मीनाकुमारीच्या गझलमधील तीव्र अर्थलालित्य काळजाचा ठाव घेणारे असते.... रुक्ष शब्दानुवादामध्ये ती भावुकता हरवली जाण्याची शक्यता असते. तेंव्हा अशा रूपान्तराचा प्रयत्न हे खरोखरच मोठे आव्हान बनते.

मूळ कवयित्रीच्या संस्कारांचा तिच्या रचनेवरचा अपरिहार्य प्रभाव लक्षात घेता दुसऱ्या शेरातला बारकावा समजून घेण्याजोगा आहे. इस्लामच्या मान्यतेनुसार मूर्तिपूजा हे कुफ्र (पाप) आहे... त्यामुळे दृश्य वस्तुंच्या कणाकणाला केलेल्या प्रार्थना (सज्दे) निष्फळ (कुँवारे) राहिल्या असं कवयित्रीला वाटतं..... पहिल्या गझलच्या दुसऱ्या रूपांतरामध्ये प्रार्थनेची व्यर्थता दाखवण्यासाठी मी त्या प्रार्थनांना "अबोध" म्हटलं आहे.... पहिल्या रूपान्तरात मात्र अर्थाची छटा थोडी बदलत त्या प्रार्थनांना "गर्भारलेल्या” (फल देण्यास सक्षम) म्हटलं आहे...!

मूळ गझलमध्ये रदीफ़ म्हणून आलेल्या "होगा" या सहयोगी क्रियापदातील भाव रूपान्तरित करण्यासाठी दुसऱ्या रूपान्तरात "असेल ना?" असा प्रश्नार्थक काफ़ियाचा प्रयोग केला आहे.



(१)



आबलापा कोई इस दश्त में आया होगा


वर्ना आँधी में दिया किस ने जलाया होगा



ज़र्रे ज़र्रे पे जड़े होंगे कुँवारे सज्दे


एक एक बुत को ख़ुदा, उस ने बनाया होगा




प्यास जलते हुये काँटों की बुझाई होगी



रिसते पानी को हथेली पे सजाया होगा



मिल गया होगा अगर कोई सुनहरी पत्थर


अपना टूटा हुआ दिल याद तो आया होगा




ख़ून के छींटे कहीं पोछ न लें रेह्रों से


किस ने वीराने को गुल्ज़ार बनाया होगा



- नाज़ (मीनाकुमारी)



काव्यानुवाद – १



काल रात्री या इथे (गझल)



काल रात्री या इथे घेण्या विसावा कोण आला


अन्यथा या वादळी हा दीप कैसा तेवलेला..



मृत्कणांचा कौल घेण्या प्रार्थना गर्भारलेल्या


मूर्तिचा एकेक येथे देवता त्यानेच केला



पेटलेल्या कंटकांची भागली तृष्णा असावी


आसवांना साठवाया ओंजळीचा द्रोण झाला..



स्वर्णवर्णाची शिळा का पाहिली त्या कोपऱ्याशी


भंगल्या प्रेमातला रे आठवावा क्षोभ त्याला..



गोठलेले रक्त येथे सांडुनी जाऊ नका रे


हा कुणाच्या आठवांचा बाग आलेला फुलाला..



(वृत्त व्योमगंगा - गालगागा गालगागा गालगागा गालगागा)



-----

काव्यानुवाद – २



असेल ना? (गझल)



कुणी थकून या इथे थिरावला असेल ना?


तरीच वादळात दीप तेवला असेल ना?



कणोकणी जडावल्या अबोध प्रार्थना इथे


शिळेशिळेत देव कोण पूजला असेल ना?



विदग्ध कंटकातली तहान भागली असो


जपून ओंजळीत अश्रु साठला असेल ना?



चकाकती शिळा कुठे बघून कोपऱ्यातली


उरात भग्न भाव तो दुणावला असेल ना?


पुसू नका इथे कुणीच रक्त या व्रणातले


विराण माळ का कुणास बाग हा असेल ना..!



(कलिंदनंदिनी - लगालगा लगालगा लगालगा लगालगा)



- स्वामीजी ९मे ०९



(२)



आगाज़ तो होता है अंजाम नहीं होता


जब मेरी कहानी में वो नाम नहीं होता



जब ज़ुल्फ़ की कालिख में घुल जाये कोई राही


बदनाम सही लेकिन गुमनाम नहीं होता



हँस हँस के जवाँ दिल के हम क्यों न चुनें टुकड़े


हर शख़्स की क़िस्मत में इनाम नहीं होता



बहते हुए आँसू ने आँखों से कहा थम कर


जो मय से पिघल जाये वो जाम नहीं होता



दिन डूबे हैं या डूबी बारात लिये कश्ती


साहिल पे मगर कोई कोहराम नहीं होता



- नाज़ (मीनाकुमारी)



काव्यानुवाद



चाहूल हूल देते.. (गझल)



चाहूल हूल देते, पाऊल वाजले ना,


जेंव्हा कथेत माझ्या ते नाव घेतले ना..



वाटेवरी कुणाच्या केसात रंगला जो


बेताल नाव त्याचे, अज्ञात राहिले ना...



केली खुशीत गोळा हृदये दुभंगलेली,


दुर्दैव ! जीवनाला बक्षीस लाभले ना...



डोळ्यात आसवे ही थांबून सांगणारी,


प्यालेच आसवाच्या धुंदीत वाहिले ना...



सूर्यास्त सागरी वा नौका बुडून गेली,


दु:खामुळे किनारे बेजार जाहले ना...



(आनन्दकन्द - गागालगा लगागा गागालगा लगागा)




- स्वामीजी १३ मे ०९




(चौथ्या द्विपदीमध्ये श्लेष लक्षात घ्यावा.... आसवे=अश्रू, आसवाच्या=मद्याच्या)









(३)



चाँद तन्हा है, आसमाँ तन्हा


दिल मिला है कहाँ-कहाँ तन्हा



बुझ गई आस, छुप गया तारा


थरथराता रहा धुआँ तन्हा



ज़िन्दगी क्या इसी को कहते है


जिस्म तन्हा है, और जाँ तन्हा



हमसफ़र कोई गर मिले भी कहीं


दोनों चलते रहें यहाँ तन्हा



जलती बुझती सी रौशनी के परे


सिमटा सिमटा सा इक मकाँ तन्हा



राह देखा करेगा सदियों तक


छोड़ जाएंगे यह जहाँ तन्हा



- नाज़ (मीनाकुमारी)



काव्यानुवाद



एकटेपणा.... (ग़ज़ल)



चन्द्र एकान्तात राही, एकले आभाळ आहे


लावला कोठे कितीही, ऊर एकान्तास साहे.



व्यर्थ ही झाली प्रतीक्षा, शुक्रतारा लोपलेला


चूल झाली शान्त आता, धूम्ररेखा एक राहे



मूढतेचा भार वाही, हे जिणे कैसे म्हणावे


तृप्तता नाही शरीरा, जीव एकान्तास वाहे...



साथ व्हावी ज्या कुणाची, ना मनाचा मेळ तेथे


एक रस्ता चालताना एकट्याने चालताहे...



भोवतालीच्या जगाच्या रोषणाईला भिऊनी


आकसूनी घे स्वत:ला झोपडे हे एक राहे...



काळ लोटू दे युगांचा, ही प्रतीक्षा एकट्याची


सोडुनी जाईन तेंव्हा, एकट्याने विश्व राहे...



(व्योमगंगा - गालगागा गालगागा गालगागा गालगागा)


- स्वामीजी १३ मे ०९



(४)



पूछते हो तो सुनो



पूछते हो तो सुनो, कैसे बसर होती है

रात खैरात की, सदके की सहर होती है


साँस भरने को तो जीना नहीं कहते या रब

दिल ही दुखता है, न अब आस्तीं तर होती है


जैसे जागी हुई आँखों में, चुभें काँच के ख्वाब

रात इस तरह, दीवानों की बसर होती है


गम ही दुश्मन है मेरा गम ही को दिल ढूँढता है

एक लम्हे की ज़ुदाई भी अगर होती है


एक मर्कज़ की तलाश, एक भटकती खुशबू

कभी मंज़िल, कभी तम्हीदे-सफ़र होती है


दिल से अनमोल नगीने को छुपायें तो कहाँ

बारिशे-संग यहाँ आठ पहर होती है


काम आते हैं न आ सकते हैं बेज़ाँ अल्फ़ाज़

तर्ज़मा दर्द की खामोश नज़र होती है


- नाज़ (मीनाकुमारी)



काव्यानुवाद



कैसे जीवन चालते... (गझल)



कैसे जीवन चालते म्हणुन का ही चौकशी चालली ?


रात्री सर्व करून दान निजता, भिक्षा पहाटे भली.



श्वासांच्या असण्यास जीवन कसे मानाल, हे ईश्वरा,



पीडा ही हृदयात खोल दडली, आस्तीन कोरी भली..


टोचूनी जणु स्वप्न-काचकपची डोळ्यात जागेपणी,



वेड्यांची सलदार रात्र ठणका होऊनिया जागली..


दु:खाला बनवून शत्रु फिरतो त्याच्याच मागावरी,



थोडेही नजरेसमोर नसले, चिंता मनी जाहली..



मैलाच्या दगडास शोधत कधी, धावे सुगंधी व्यथा


वाटे सापडला पडाव अथवा यात्राच आरंभली..



रत्नाला हृदयातल्या लपविणे व्हावेच येथे कसे ?


रात्री वा दिवसा खडे दगड ही वृष्टी वृथा लाभली..



शब्दांची कसली मिरास म्हणता, कामास काही न ये,


दु:खाची परिभाष काय करता मौनाविना चांगली..?



(वृत्त शार्दूलविक्रीडित)



- स्वामीजी १७ सप्टें ११



अपने होठों पर सजाना चाहता हूँ


अपने होठों पर सजाना चाहता हूँ


, तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ




कोई आँसू तेरे दामन पे गिराके,


बूँद को मोती बनाना चाहता हूँ



छा रहा है सारी बस्ती में अंधेरा,


रोशनी को घर जलाना चाहता हूँ



थक गया हूँ करते करते याद तुझको,


अब तुझे मैं याद आना चाहता हूँ



आखिरी हिचकी तेरे जाने पे आए,


मौत भी मैं शाइराना चाहता हूँ



मूळ गझल: कतिल शिफ़ाई



काव्यानुवाद



अधरांवरी तुला मी .... (गझल)



अधरांवरी तुला मी सजवू पहात आहे,


तुजशीच गुंजनाने मिसळू पहात आहे..



पदरावरी तुझ्या जे निखळून थेंब आले,


हलकेच मोतियांना जमवू पहात आहे..



वसतीत दाटलेला तम काजळापरी हा,


घरट्यात दीप माझ्या उजळू पहात आहे..



थकलोय आठवीता तुज नेहमीच आता,


तुझियाच आठवांशी सलगू पहात आहे..



उचकी मला अखेरी तुजला निरोप देता


मरणात काव्य माझे जगवू पहात आहे..



(वृत्त कल्याणी - ललगालगा लगागा ललगालगा लगागा



- स्वामीजी १--११

1 टिप्पणी:

sudeepmirza म्हणाले...

excellent...