१.
जीवघेण्या पावसाने
जीवघेण्या पावसाने काळजाचे घर बुडाले
मोडक्या जगण्याप्रमाणे, मोडके छप्पर बुडाले !
माणसांच्या आसवांचा पूर का पाण्यास आला
सांगतो जो तो किनारा, लोग काठावर बुडाले !
कैद पाण्याची अशी की- जन्ममृत्यूची मिठी ही
या सुनामी पावसाने, हे नदी सागर बुडाले !
माणसे वाहून गेली, वाचली तीही अशी की -
राहिले आयुष्य कोरे, नेमके दप्तर बुडाले!
श्वास चक्री वादळाचे, जगबुडीच्या रक्तधारा !
खोल जगण्याच्या तळाशी एक जन्मांतर बुडाले!
वाहुनी संसार गेले, वाहुनी गेली घरे ही
वाचले यातून काही, वाचल्यानंतर बुडाले
हात बुडत्यानेच बुडत्याला दिला, मग वाटले की-
माणसातिल देव आहे शेंदरी पत्थर बुडाले !
२.
गझले एवढे तुझे ..
एवढे गझले तुझे बळ पाहिजे
पत्थराला लागली कळ पाहिजे
पावसाचे कूळ माझी आसवे
माझीया खडकास हिरवळ पाहिजे
मोग-याचा गंध प्रीतीला जरी
या फ़ुलावाचून दरवळ पाहिजे
धर्म सारे माणसांचे आरसे
आरशाची काच निर्मळ पाहिजे
मरण हे त्याचेच समजावे खरे
वाटली सरणास हळहळ पाहिजे
चांदण्या असतील ही नसतील ही
काजव्यांची एक चळवळ पाहिजे
रक्त सत्याचे कुठे सांडू नये-
एवढ्यासाठीच ओंजळ पाहिजे
गवसले नाहीत मोती सागरी
काळजाचा गाठला तळ पहिजे
डागसुद्धा तीळ होतो देखणा
कोवळ्या चंद्रास काजळ पाहिजे
३.
शब्द साध्या माणसांचे
शब्द साध्या माणसांचे, सोबतीला फ़क्त होते
वाटले अश्रू तुला ते, काळजाचे रक्त होते !
कोणत्याही पावसाने, संपला दुष्काळ नाही
दोन अश्रूंनी खरे, आभाळ सारे व्यक्त होते !
त्या सुळांच्या लेखण्यांनी कोरला इतिहास ज्यांचा
फ़ास त्यांचे हार होते, सरण त्यांचे तख्त होते !
देवळांना काय सांगू, दुःख मातीच्या घरांचे
हुंदके माझे जगाच्या, वेदनेचे भक्त होते !
कोवळ्या रानात हिरवा, मोक्ष मातीला मिळाला !
कालचे भगवे बहाणे, केवढे आसक्त होते !
देखण्या स्वप्नात एका, स्वप्न तू झालीस माझे
मी तुझ्यासाठी पहाटे, वेचले प्राजक्त होते !
धुंद दरवळत्या सुगंधाला जरी मुक्ती मिळाली
कोवळ्या बोगस काट्यांचे पहारे सक्त होते!
४.
उधळू नकोस माझ्या
उधळू नकोस माझ्या, स्वप्नात सोनचाफ़ा
आताच वेदनांचा गेला निघून ताफ़ा !
झाल्या फ़ितूर झाल्या, लाटाच या नदिला
सोडू नका कुणीही, पाण्यावरी तराफ़ा !
दुःखास मी कशाचा, सांगा रतीब लाऊ?
धारोष्ण आसवांच्या, संतप्त रोज वाफ़ा !
थडग्यावरी उभे जे, ते उंच उंच झाले
त्याहून चांगली रे, उंची तुझी जिराफ़ा !
येतील तेच यंदा, निवडून भाग्यशाली
माझ्या तुझ्या चितेला, जे मारताच लाफ़ा!
चर्चा हूशार तुमच्या, रेखीव अक्षरांची
मी बंद काळजाचा, उघडू कसा लिफ़ाफ़ा ?
मातीमधून आलो, मातीत जायचे रे
मातीत भाकरी अन सोने तुझे सराफ़ा !
५.
पावसाचे पत्र
पावसाचे पत्र नाही हा ढगांचा अर्ज आहे
दुःखितांच्या आसवांचे पावसावर कर्ज आहे
लागते सा-या जगाची भूक शेताला उपाशी
धर्म एकच भाकरीचा जात त्याला वर्ज आहे
आटल्या विहिरी तळे, पण, रहिले डोळ्यात पाणी
शब्द पहिल्या पावसाचा केवढा खुदगर्ज आहे
सागराचे ह्र्दय उपसुन उंच भरला कुंभमेळा
गर्जते आभाळ हे की, तानसेनी कर्ज आहे
उगवतो मातीत काळ्या, न्याय कष्टाचाच हिरवा
अमृताचा अर्थ ओला, घाम जो उत्सर्ज आहे
कोवळी कविता पिकांची, मेघधारांनी लिहावी
पाखरांच्या बोलण्याला बासरीची तर्ज आहे
1 टिप्पणी:
खूपच छान।
श्याम माळी बदलापूर
टिप्पणी पोस्ट करा