८ ऑक्टोबर, २०११

श्रीराम गिरी : चार गझला







१.



चावे



न देणे न घेणे कुणाला कुणाचे;


कुठे मोल आता इथे भावनांचे.



किती रोज चावे,किती रोज दु:खे;


हसे फार झाले गड्या जीवनाचे.



तुला द्यावया सावली वाटते रे;


इथे झाड व्हावे तुझ्या अंगणाचे.



जरी चिंतनाने मिळालो धुळीला;


तरी वेड गेले कुठे चिंतनाचे!



तमा मी न केली कधी संकटाची;


हसू येत गेले मला सांत्वनाचे.



कसा दोष देऊ तुम्हा निंदकांनो;


तुम्ही काम केले खरे अंजनाचे.




२.



चाहूल




वादळाची लागली चाहूल येथे;


ही हवा नाही मला अनुकूल येथे.



नित्य करुनी पाहिले सत्कर्मही मी


आठवे अद्यापही ती भूल येथे.



छान झाले हे मलाही ज्ञात झाले,


सभ्यतेची लागते का झूल येथे.



ती कशी अमुची हितैषी सांग बाप्पा;


विझवली ज्या दंगलीने चूल येथे.



नाव द्यावे फक्त याला माणसाचे;


बांधुनी जो ठेवला मी पूल येथे.



ना उगा ही पेटती रे शांत शहरे;


उठवती कोणी विखारी हूल येथे.




३.



झेप



दोनेक बाजुनी मी आहे उणा जरासा;


पोटात घे गडे तू माझा गुन्हा जरासा.



होता दबा धरूनी माझ्या घरात तोही;


दिसला अखेर त्याचा काळा फणा जरासा

.



घ्या उंच झेप नक्की,जिंका जगास अवघ्या;


लक्षात मात्र ठेवा रस्ता जुना जरासा.




बघ शेत कोरडे हे काटे उरात ज्याच्या;


यंदा तरी बरस तू माझ्या घना जरासा.



नाही कळून आले हे वादळात तेव्हा;


झुंजीत कोणत्या हा पिचला कणा जरासा.



४.



तपास



हे कोणते कळेना होतात भास येथे;


का कारणाविना रे मन हे उदास येथे.



सांगून ज्यास गेले माझ्यापरीस ज्ञानी;


बोलून काय बोलू मी ह्या जगास येथे.



गेलीस सोडुनी तू, नाराज ना जरा मी;


मी सोडली तुझी ना अद्याप आस येथे.



माणूस हा पुरेसा नाही अजून कळला;


माझा अजून आहे चालू तपास येथे.



शाबूत ठेवले मी अनमोल स्वप्न माझे;


झालो जरी भलेही अवघा हरास येथे.



मी एकटाच,शंका तिळमात्र ह्यात नाही;


का शोधतो कुणाला मग आसपास येथे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: