२३ ऑक्टोबर, २०१२

रविप्रकाश : एक गझल




किती घासू ललाटाला नशीबाला गिळे भाकर;
उपाशी ठार मेल्यावर चितेवरही छळे भाकर.

तुझ्या समृद्ध राष्ट्राचे भिडे का पोट पाठीला?
कुपोषण पाहुनी येता चुलीवर हळहळे भाकर.

पसरले हात असते तर किती श्रीमंत असतो मी?
कळेना मूर्ख कष्टाला फुकाचीही मिळे भाकर.

तिला मी पाहिले तेव्हा भडकली आग पोटाची;
किती लागू तिच्या मागे...पुढे साली पळे भाकर.

चला फडतूस डिगर्‍यांनी विणूया दोर फाशीचा;
फटीचर नोकरीसाठी जवानीची जळे भाकर.

कितीदा स्वाभिमानाने भुकेला ठेचले आम्ही;
तशी तर रोज कुत्र्याला तुपासोबत मिळे भाकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: