२३ ऑक्टोबर, २०१२

अरुण (शुभानन चिंचकर) : दोन गझला







झुकवली ती मान मी, जी ताठ होती;
हाय, माझ्याशीच अंती गाठ होती.

मी कुठे पुसले, मला का टाळले तू?
कारणे सारी मला ती पाठ होती.

केवढी दूरी तुझ्यामाझ्यात होती;
नाव मी बुडतीच अन तू काठ होती.

केवढी तू शूर अन दिलदार होती;
घाव जेथे घातले ती पाठ होती.

'अरुण' नाही खंत त्या ताटातुटीची;
माहिती होतेच, ती निरगाठ होती!


२.

वसंत माझा सरून गेला;
हरेक पक्षी उडून गेला.

बघून माझी उजाड खोपी;
उनाड चंदा हसून गेला.

मढ्याप्रमाणे निजे भुकेला;
यमा कसा तू फसून गेला.

उरात ज्याच्या दया न माया;
जगात या तो तरून गेला.

निवांत घे तू छळून दु:खा;
सुखा, मघा तू छळून गेला!

कसा 'अरुण' तू जगानिराळा;
स्वत:स जो विस्मरून गेला!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: