२३ ऑक्टोबर, २०१२

शीलवंत सिरसाट : दोन गझला






१.

भावनांना, वेदनांना, वासनांना;
ठेवले काबूत सा-या वादळांना.

कागदी झाले अता व्यवहार सारे;
भाव आला केवढा ह्या कागदांना.

पोचले चंद्रापुढेही लोक आता;
राहिले आकाश कोठे पाखरांना.

बैलजोडीची दशा वाईट आहे;
अन सुगीचे दिवस आले माकडांना.

जर मला आहेस तू विसरून गेली;
पावले अडतात का मग चालताना?

दूर नाही या युगाचा सूर्य काळा;
माणसे खातील जेव्हा माणसांना.

ही कुणाची याद आली चिंबओली;
खंड नाही आज कैसा आसवांना!

२.


मी कसा देणार आता गर्द छाया;
झाड माझे लागले निष्पर्ण व्हाया.

लेखले नाही कमी वै-यास ज्यांनी;
जिंकल्या हो त्याच लोकांनी लढाया.

नोकरी, शेती, क्रिडा व उद्योगधंदे;
राहिल्या मागे कुण्या क्षेत्रात बाया.

वादळे घेऊन येते ही व्यवस्था;
लागतो जेव्हा कधी मी मोहराया.

गाठली तेव्हा कुठे ऊंची नभाची;
घातला आधी इथे मजबूत पाया.

गात नाही कोकिळा पूर्वीप्रमाणे;
राहिल्या कोठे शिवारी आमराया.!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: