२३ ऑक्टोबर, २०१२

श्रीराम गिरी: तीन गझला




१.

वंचना

सोबतीला जन्मभर ही वेदना होती;
कां अशी माझ्याच नावे वंचना होती?

तू उगा ह्या फुंकरीने ढाळल्या शंका-
कोणती डोळ्यात माझ्या वासना होती?

नियम,अट अन मागण्यांचा खेळ झाले जे;
फार पूर्वी प्रेम येथे साधना होती.

सांग आता हारण्याची कारणेही तू-
जिंकण्याची रोज माझी योजना होती.

काय वर्णू कौतुके त्या अडथळ्यांची मी;
संकटे तेव्हा खरोखर चालना होती.


रेखाचित्र : प्रकाश बाल जोशी
२.

मात

करणार मी कुणाचा विश्वासघात नाही;
जाईन मी पुढे पण देणार मात नाही.

बघ अंतरातुनी रे आवाज येत आहे;
ओठातुनी तसे मी केव्हाच गात नाही.

मी दाखला कुणाचा देऊ जगास माते;
ममता तुझ्याच आता जर काळजात नाही.

केले तिच्या सभोती पाहा कडे उभे रे;
या वादळात आता विझणार वात नाही.

शमवून भूक असतो आत्मा इथे उपाशी;
ही हेळ्सांड बाळा वृद्धाश्रमात नाही.

गीता यथार्थ आधी ही लागते जगावी;
पारायणे करूनी हा मोह जात नाही.

३.

स्वप्नासमान येथे

स्वप्नासमान येथे नाही दुजे विखारी;
ठेवू नकोस कुठली तू लालसा अघोरी.

आला कसा न न्याया,देऊन वेळ मृत्यू?
वाया अखेर गेली माझी पुन्हा तयारी.

मी घेतली उडी ती होती तुझ्याचसाठी;
तू वाट पाहिली अन माझी म्हणे किनारी.

माझ्या मुक्या सतारी तू छेडल्यास केव्हा?
कळली तुला कधी ती माझी उपासमारी!

गळफास आवळोनी तो कर्जमुक्त झाला...
करण्यास शोक आता येतील ते पुढारी.

ह्या सोंगट्यातला रे होतो वजीर मीही;
पडली उणी तरीही दुनियेपुढे हुशारी.

मज सांग एकदाचा अपराध काय माझा;
केलीस का जगा रे माझ्यावरी मुजोरी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: