२३ ऑक्टोबर, २०१२

नजीमखान : तीन गझला




१.

ती निखार्‍यासारखी जी भूक होती;
मांडताना का अशी अंधूक होती.

मारली होती व्यवस्थेने फुली का?
जिंदगानी आमची का चूक होती.

आजही खेदात माझी लेखणी ही;
कोवळया हातात का बंदूक होती.

मखमली वाटा जरी असती पुढे ह्या;
पावलांना ठेचही ठाऊक होती.

टाळली आमंत्रणॆ त्या वादळांनी;
झोपडी माझी म्हणे नाजूक होती.


२.

ऊन,थंडी न पावसासाठी;
ये लिहू फक्त माणसासाठी.

घालतो तोच फाटके कपडे;
राबणाराच कापसासाठी.

आज वृद्धाश्रमात का गर्दी?
का हवा पूत्र वारसासासाठी.

देश हा श्वास श्वास सर्वांचा;
रक्त सार्‍या नसानसासासाठी.

दूध पाजे जरी भुकेली ‘ती’
माय ती माय पाडसासाठी.

मान,पैसा नको दिलासाही;
शब्द दे फक्त साहसासाठी.

३.


इथे कोमेजणार्‍या काळजांच्या स्पंदनासाठी;
जरासे मोकळे बोलून घेऊ जीवनासाठी.

नसावी फक्त चर्चा वाढणार्‍या वाळवंटाची
प्रयत्नांची पराकाष्ठा हवी नंदनवनानासाठी.

जरी ते वृद्ध होते,पाखरांचा आसरा होते;
जगाने तोडले जे झाड माझे इंधनासाठी.

रूढी माहीत नसते पावसाला भेदभावाची;
जसा तो बाभळीसाठी,तसा तो चंदनासाठी.

शिळ्याही भाकरीला स्वाद येतो...सांगते आई...
बसा एकत्र आता सर्व बंधू भोजनासाठी.

फुलेही शब्द,पाने शब्द,होई वाक्य झाडांचे,
निसर्गाला जरा वाचून घे हिरव्या मनासाठी.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: