१.
मोसम
पाहून मोसमाची बेमान रीत आता;
विसरून पार गेलो पाऊस गीत आता.
व्यवहार पोसणार्या शहरात एक वेडा;
फिरतोय शोधण्या बघ निर्व्याज प्रीत आता.
जगण्यात रोज मेली ही जिंदगी अशी की
मरणास ही खर्या मी नांहीच भीत आता.
सुख एक दूर जाता आली अनेक दुखे:
माझ्या सवे रहाया या झोपडीत आता.
आजन्म ओढ होती ज्याची तुला उन्हा रे;
उरला न गारवा तो या सावलीत आता.
अडवू नको किनार्या तू वाट आज माझी;
घेण्यास मी निघालो वादळ मिठीत आता.
२.
विसावा
या तुच्छ जीवनाला इतकाच वर मिळावा;
सेवेत शोषितांच्या बस देह हा झिजावा.
निर्व्याज ती नजर दे डोळ्यास मज अशी की
भगवा, निळा नि हिरवा मज सारखा दिसावा.
जग दूरचे खरोखर दारी जरूर आले;
पण आपसी दुरावा केव्हां इथे मिटावा?
वस्ती गरीब कोणी जर जाळलीच नाहीं;
मग धूर सारखा हा तेथून कां निघावा?
जमलेत आप्त सारे छळन्या मला इथेही;
सरणावरी जरा मी जो घेतला विसावा.
३.
शेवटी-शेवटी
हट्ट सोडून दे शेवटी शेवटी;
नाखुशीनेच ये शेवटी शेवटी.
पोळल्यावर सखे दुष्ट शहरी तुझ्या;
गाव मज आठवे शेवटी शेवटी.
अंतरी नेमका मीच होतो तुझ्या;
तू जरी जाणले शेवटी शेवटी.
दावण्या या जगी मी खरा चेहरा;
मुखवटे काढले शेवटी शेवटी.
जिंकुनी वादळे मी बुडालो खरा;
या किनारी गडे शेवटी शेवटी.
पाहुनी रूप मी या जगाचे खरे;
तत्व गुंडाळले शेवटी शेवटी.
बोलणे सत्य माझे सदा जीवनी;
यार ठरले गुन्हे शेवटी शेवटी.
या प्रवासात मज सोबती राहिले;
फक्त रस्तेच हे शेवटी शेवटी.
लोक आतूर असता गझल ऐकण्या;
संपले शब्द हे शेवटी शेवटी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा