गझल हा जसा कवितेचा सशक्त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्न.
२३ ऑक्टोबर, २०१२
अभिषेक उदावंत : पाच गझला
१.
उनाड
पाठीवरती चार मुलींचा पहाड आहे;
नशीब माझे मुलाप्रमाणे लबाड आहे.
इथे फुलांनी कसे जगावे ? कुठे लपावे ?
लोकांची ह्या नजर बुहारी गिधाड आहे.
आठवणींचा पाऊस म्हणजे ढगासारखा;
कधी झडीचा, कधी अचानक उघाड आहे.
चिमटीमधले सुटून जाते धरता धरता;
मन माझेही फूलपाखरू उनाड आहे.
नसेल काही तरी चालेल फक्त प्रेम दे;
आयुष्याचे तेच खरे तर घबाड आहे.
२.
नोंद
प्रेम,साकी,फूल,स्वप्ने,चंद्र,तारे;
हे सुखाचे सोबती आहेत सारे.
चोरटयांनी चोरला टागोर,गांधी;
राहिले नाही भरवशाचे पहारे.
काळजी नाही मला माझ्या फुलाची;
सांगती सारी खुशाली रोज वारे.
कोणती ही नोंद माझ्या विक्रमाची
मी बुडालो ते उथळ होते किनारे.
आटले डोळयातले पाणी अचानक;
पाहिले मी एवढे ताजे निखारे.
झोपडयांचे हे बघा शनि शिंगणापुर;
बंगल्यांना केवढी मजबूत दारे.
३.
बेत
सोयीनुसार त्यांच्या काढाल प्रेत माझे;
करतील राजकारण भरल्या सभेत माझे.
जाईल तोल इतके पेल्यात मद्य ओता;
सांगेल सर्व काही चढत्या नशेत माझे.
मातीत राबलो मी आयुष्यभर परंतू
डोळयात फक्त आले हिरवेच शेत माझे.
तुटले असेल काही त्याचा न खेद काही;
मी बांधलेच होते मजले हवेत माझे.
युध्दात सोड...साध्या प्रेमात हारलो मी;
मी आखलेच नव्हते केव्हाच बेत माझे.
गझलेत दुःख सारे आतून मांडतो मी;
वरतून सांगतो की, बाकी मजेत माझे.
४.
दिवाळी
कधी सकाळी, कधी दुपारी, संध्याकाळी;
भेटत होतो आपण दोघे एकेकाळी.
माझे चुकते तसे तुझेही चुकत असावे;
वाजत नाही एका हाताने गं टाळी.
आधी होते आता कोठे तसे राहिले;
मी दिसलो की, आठी पडते तुझ्या कपाळी.
सुंदर गोरा रंग नेहमी तुलाच सलतो;
कारण थोडी रंगाने तू आहे काळी.
तू चिडली की स्मशान होते माझे अंगण
तू हसली की, सडा, सारवण, रंग, दिवाळी
५.
विदुषक
जे चुकीचे आत आहे
ते मनाला खात आहे
आंधळयाचा ठोस दावा
सूर्य अंधारात आहे
जीव घ्यावा विदुषकाने
मग मजा मरण्यात आहे
देव माना भाकरीला
मोक्ष हा पोटात आहे
दूत आम्ही शांततेचे
शस्त्र हे हातात आहे
पिंजर्याला हा दिलासा
पाखरू गावात आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा