२३ ऑक्टोबर, २०१२

जनार्दन म्हात्रे : दोन गझला



१.

विरंगुळा ना पूर्वीइतुका मिळतो आता;
दिवस उगवत्या व्यापांमध्ये ढळतो आता.

कुणी न समजून कधी घेतले मनास माझ्या;
तुला तरी मी सांग कितीसा कळतो आता.

गत स्मृतींची मनात दाटी-दाटी होते;
श्रावण या पापण्यात गच्च तरळतो आता.

तुझ्या मनाची खंत बावरी मुळीच नाही;
भेटण्यास आतुर मीही तळमळतो आता.

एक असुनही मनात हे अंतर का पडले?
का विरहाच्या उन्हात दोघे जळतो आता.

क्षणांमुळे ज्या आयुष्यच हे ढवळून गेले;
काय बिनसले शोधत मी घुटमळतो आता.

बागडण्याचे दिवस संपले कायमचे अन;
कर्तव्याची दु:खे रोजच दळतो आता.

२.

खरे बोलतो...तुला खरे का वाटत नाही;
गझल कधीही खोटे काही सांगत नाही.

जरूर या नजरेत आर्जवी ओढ असावी;
उगीच मन हे असे कुणावर भाळत नाही.

आपुलकीने घट्ट मुलामा दे प्रेमाचा;
त्यावाचुन हे तुटलेले मन सांधत नाही.

गजबजलेली दु:खे माझ्या झोळीमध्ये;
तरी सुखाचे दान कुणा मी मागत नाही.

नको अशी पापण्यांत दडवून ठेवू स्वप्ने;
भिजल्यानंतर अर्थ कशाचा लागत नाही.

जगण्यावर दु:खाचे हे उपकार म्हणावे;
सुख कोणाचे कधी एकटे नांदत नाही.

जरी वाटतो शेवट...हा प्रारंभच आहे;
आयुष्याचा प्रवास वळतो...थांबत नाही!













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: