प्रल्हाद सोनेवाने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रल्हाद सोनेवाने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

८ ऑक्टोबर, २००८

वैनगंगेच्या तिरी : प्रल्हाद सोनेवाने




हिंडलो वेड्यापरी या वैनगंगेच्या तिरी;
जीव झाला बासरी या वैनगंगेच्या तिरी.

झोपड्यांचे गाव माझे, माणसे साधीसुधी;
हीच माझी पंढरी या वैनगंगेच्या तिरी.

राबती मातीत काळ्या पांडुरंगाची रूपे;
द्यावयाला भाकरी या वैनगंगेच्या तिरी.

या निळ्या पाण्यात रात्री चंद्र-तारे डुंबती;
स्वर्ग येई भूवरी या वैनगंगेच्या तिरी.

ओततो गगनातुनी कोणीतरी मातीवरी-
अमृताच्या घागरी या वैनगंगेच्या तिरी.

हीच गंगा, वंद्रभागा,नर्मदा,इंद्रायणी;
मोक्ष ये दारावरी या वैनगंगेच्या तिरी.

आमराईतून कोणी जन्मजन्मांचा सखा-
शीळ घाली अंतरी या वैनगंगेच्या तिरी.

मी कधी होऊन राधा हाक त्याला मारतो;
भेट देई श्रीहरी या वैनगंगेच्या तिरी.

वाटतो देवास हेवा,तो म्हणे घेईन रे-
जन्म मी केंव्हातरी या वैनगंगेच्या तिरी!’

हॅलो : (०७१८६) २४५३८६

६ ऑगस्ट, २००८

याचसाठी जन्मलो मी

आसवांना हासवाया जन्मलो मी;
दु:ख पोटी वागवाया जन्मलो मी.

फक्त अंधाराविना जेथे न काही;
त्या जगाला जागवाया जन्मलो मी.

टाळती जेथे घृणेने लोक ज्यांना;
त्यांस पोटाशी धराया जन्मलो मी.

गांजलेल्या जीवनाला अर्थ यावा;
याचसाठी देवराया जन्मलो मी.

वाटते पृथ्वी शिरी घ्यावी परंतु
पांगळी घेवून काया जन्मलो मी.

दु:ख एकाकी नसावे रे म्हणोनी,
प्राशुनी ते मोहराया जन्मलो मी!


- प्रल्हाद सोनेवाने
०७१८६-२४५३८६