८ ऑक्टोबर, २००८

सज्जनांचा : श्रीराम गिरी







हा एवढ्याचसाठी मज ध्यास सज्जनांचा;
तारून न्यावया हा सहवास सज्जनांचा.

वधस्तंभ आजही ते रक्तात माखलेले;
आहे अजून ताजा इतिहास सज्जनांचा.

ही श्वापदे विहरती विसरून वैर जेथे;
बहुतेक तो असावा आवास सज्जनांचा.

चालू परंपरा तीच फुलास बोचण्याची;
ना संपणार येथे वनवास सज्जनांचा.

जगतात जीवजंतू त्यांच्यामुळेच येथे;
साधासुधा न वेड्या हा श्वास सज्जनांचा.

आकाश कंप पावे,धरती दुभंगली ही;
पाहून चेहरा आज उदास सज्जनांचा.

ज्यांची मने फुलांची,अन् देह चंदनाचा;
होतो कसा कळेना तुज त्रास सज्जनांचा.

मो. ९७६३००४४९४

1 टिप्पणी:

Asha Joglekar म्हणाले...

जगतात जीवजंतू त्यांच्यामुळेच येथे;
साधासुधा न वेड्या हा श्वास सज्जना
फारच सुरेख.