२१ ऑगस्ट, २०११

आज तुम याद बेहिसाब आए : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'


प्रिय रसिक,
उर्दू काव्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा उर्दू गझलमध्ये मीर, गालीब, दाग इकबाल, जिगर यांच्यासोबत आणखी एक नाव आदराने घेतल्या जाते ते म्हणजे प्रख्यात शायर प्रगतीशील आंदोलनाचा प्रवर्तक फैज अहमद फैज.
फैज शायरी गझल लिहण्याविषयी अतिशय संवेदनशील होता. एका ठिकाणी तो म्हणतो 'शेर लिखना जुर्म न सही लेकीन बे वजह शेर लिखते रहना ऐसी अक्लमंदी भी नही है'।
फैजच्या शायरी/गझल नज्मवर त्याने अनुभवलेल्या जीवनातील प्रसंगाचा फार मोठा प्रभाव आहे. फैज अहमद फैजचा जन्म जिल्हा सियालकोट येथे झाला. १९३४ ला शिक्षण पूर्ण झाल्यावर १९३५ ला अमृतसर येथे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर लाहौरला १९४0 मध्ये बदलून गेले. त्या काळात गझल लिहणे सुरू होते. १९४१ मध्ये मिस एलिस जार्ज या इंग्रजी महिलेशी प्रेमविवाह करणारा फैज म्हणतो,
दोनो जहाँन तेरी मुहब्बत में हारके
वो जा रहा है कोई शबे गम गुजारके।
वीरा है मैकदा, खुमो सागर उदास है
तुम क्या गये की रुठ गये दिन बहारके।।
दुनिया ने तेरी याद से बेगाना कर दिया
तुझसे भी दिल फरेब है गम रोजगारके ।।
एकेकाळी प्रेयसी, तिचे सौंदर्य, डोळे यात भान हरवून जाणारा शायर फैजच्या जीवनात कलाटणी मिळाली. १९४२ मध्ये दुसरे विश्‍व युद्ध सुरू झाले. फैज शिक्षण कार्य सोडून सैन्यात भरती झाले आणि १९४३ मध्ये कर्नल होऊन दिल्ली येथे आले. १९४७ मध्ये भारत/पाकिस्तान हे दोन तुकडे झाले आणि सैन्यात असलेले फैज पाकिस्तानी सैन्यासोबत लाहौर येथे आले. तेथे फैजने नोकरीचा राजीनामा दिला. परंतु आपल्या प्रगतीशील विचारांचा प्रभाव म्हणा की काय, पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री लियाकत अलिखान यांच्या सरकारला धोका निर्माण करण्याचा, षडयंत्राचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला व १९५१ मध्ये ४ वष्रे १ महिना कैद झाली.
मित्र, पत्नी, मुले यांना भेटावयाची मनाई आणि तुरुंगात पेन व कागद वापरण्यावर बंदी. परंतु फैजमधला शायर जिवंत होता. त्याने तुरुंगाच्या भिंतीवर कोळशाच्या साह्याने शेर लिहणे सुरू ठेवले.
मता ए लोहो कलम छिन गई तो क्या गम है।
कि खूने दिल में डुबोली है उँगलीया मैने
आणि मग रोमांसवाद, स्वप्नाळूपणा यातून पूर्णपणे मुक्त होऊन फैजची शायरी बहरली आणि तो आपल्या प्रेयसीला म्हणाला,
अब भी दिलकश है तेरा हुस्न मगर क्या कीजे
और भी गम है जमाने में मुहब्बत के सिवा
मुझसे पहली सी मुहब्बत मेरे महेबुब न मांग
राहते और भी है वस्ल की राहत के सिवा।।
तुरुंगात फैजने लिहिलेल्या अधिकतर कविता 'दस्ते सबा' व 'जिंदानामा' या दोन काव्यसंग्रहात समाविष्ट आहेत. १९५९ ला फैज तुरुंगातून सुटले आणि साहित्यिक कार्यामध्ये स्वत:ला वाहून घेतले. उर्दूची प्रसिद्ध साहित्यिक पत्रिका अदबे लतीफ पाकिस्तान टाईम व इमरोज या सर्व पत्रिकांचे ते प्रधान संपादक होते. १९६२ मध्ये फैज यांना साहित्यिक सेवेसाठी लेनिन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्यिक, शायर, कवी कसा असते, याचा एक परिपाठ त्यांनी घालून दिलेला. आपल्या एका कवितेत फैज म्हणतात,
हरेक दौर मे हम, हर जमाने में हम
हर पीते रहे गीत गाते रहे।।
जान देते रहे जिन्दगी के लिये
दिन ओ दुनिया की दौलत लुटाते रहे
जो भी रस्ता चुना उसपे चलते रहे।
जिन पे आँसू बहाने को कोई न था
अपनी आँख उनके गम में बरसती रही
लोग सुनते रहे साज ए दिल की सदा
अपनी गजल सलाखो से छनती रहे
सहल यूँ राह जिन्दगी की है
हर कदम हमने आशिकी की है
हमने दिलमे सजा लिये गुलशन
जब बहारोने बेरूखी की है।।
फैजची शायरी कष्टकरी समाजाची होती. मजदूर, शेतकरी यांच्या कार्यक्रमांना त्यांना आवर्जून बोलावल्या जायचे. उर्दू जगताचा हा आधुनिकता वादाचा कट्टर पुरस्कर्ता शायर १८ नोव्हेंबर १९८५ लाहौर येथे पैगंबरवासी झाला आणि शेवटी त्याची आठवण होतांना त्यांचाच शेर आठवतो.
कर रहा था गमे जहाँ का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आये।
मो. ९८५0१३५४0५


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: